अजितदादांनी आझम पानसरे यांची भेट घेतली; पानसरे यांच्या घरी जाऊन केली तब्येतीची विचारपूस

0
892

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – आमदार अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन बुधवारी (दि. ६) सकाळी भेट घेतली. पानसरे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे अजितदादांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केल्याचे समजते. परंतु, या भेटीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोनवेळा शहराध्यक्ष झाले होते. परंतु, अजितदादांसोबत त्यांचे फारसे न जमल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यांचे मन काँग्रेसमध्ये फार काळ रमले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते घरीच असतात.

आमदार अजितदादा पवार यांनी बुधवारी सकाळी अचानक आझम पानसरे यांच्या निगडी, प्राधिकरण येथील घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पानसरे हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार की काय?, असे अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.