अखेर संगीत अकादमीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल

0
201

पिंपरी,दि.१६(पीसीबी) – महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणा-या संगीत अकादमीचा विषय स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे. निगडीतील कलादालन येथे ही अकादमी सुरू होणार होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सध्या निगडी, चिंचवड, संभाजीनगर, संत तुकारामनगर येथे संगीत अकादमी चालविल्या जातात. या संगीत अकादमीमध्ये शास्त्रीय गायन, सुगम गायन, तबलावादन, हार्मोनियम वादन आदी विषय शिकविले जातात. या अकादमीमध्ये प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई या अधिकृत संस्थेमार्फत परिक्षेस बसविले जाते.

संगीत अकादमी सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या प्रारंभिक ते विशारद या परिक्षांमध्ये अंदाजे 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरात सांस्कृतिक चळवळ निर्माण व्हावी. तसेच नागरिकांचा सहभाग वाढविणे ही संकल्पना रूजण्यासाठी कला, संगीत अकादमीचे कामकाज विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात कला, संगीत अकादमीचे काम निरंतर चालवण्यासाठी प्रख्यात शास्त्रीय गायक महेश काळे यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी ई-मेल द्वारे पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी सुरू केल्यास ही अकादमी इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असे कळविले आहे. त्यानुसार, संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना महापालिकेचे 9 संगीत शिक्षक आणि अस्तित्वात असलेल्या जागेचा वापर करता येईल. त्याच बरोबरीने संपूर्ण संगीत अकादमीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका प्रशासकीय अधिका-याची आणि दोन जादा संगीत शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

सध्याच्या संगीत अकादमीच्या दुरूस्तीसाठी पाच लाख ही खर्चाची मर्यादा राहील. टप्प्याटप्प्याने अकादमीस योग्य त्या सुविधा महापालिकेमार्फत निर्माण करण्यात येतील. या बाबींबरोबर प्रेक्षागृह, संगीत सभागृह, कार्यशाळेसाठी जागा आणि जाहिरातीसाठी आवश्यक स्त्रोत या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. संगीत अकादमीत पहिल्या वर्षी 500 विद्यार्थी, दुस-या वर्षी 750 विद्यार्थी आणि तिस-या वर्षी एक हजार विद्यार्थी यांचा समावेश विचारात घेऊन प्रशासकीय व आवश्यक स्त्रोतांचे नियोजन करावे लागेल. महेश काळे यांनी अतिरिक्त स्त्रोताबाबतही माहिती दिली आहे.

संगीत अकादमीकरिता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत व महापालिका शाळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी एक हजार रूपये असे मासिक शुल्क महेश काळे संगीत अकादमी आकारेल. पिंपरी-चिंचवड महापालिका अणि महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक यांच्यावतीने ही संगीत अकादमी चालविण्यास येणा-या खर्चास महापालिका सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी करारनामा करून अकादमी चालविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येणार होते. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड स्कुल ऑफ म्युझिक निगडीतील कलादालन येथे सुरू करण्यासाठी स्थायी समिती सभेमार्फत हा ठराव महापालिका सभेकडे पाठविण्यात येणार होता. परंतु, स्थायी समितीने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे.