मध्यमवर्गाची व्यथा, आई जेवू घालेना अन् बाप भीक मागू देईना कोरोना आख्यान भाग ८ – अविनाश चिलेकर

0
570

मध्यमवर्गाची व्यथा, आई जेवू घालेना अन् बाप भीक मागू देईना

कोरोना आख्यान भाग ८ – अविनाश चिलेकर

पिंपळे गुरव मधील एका सामान्य महिलेने मध्यमवर्गाची व्यथा मांडणारी व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती. शहरभर हजारो व्हाटसअप ग्रुपवर ती गोल गोल फिरली. गावभर चर्चेचा विषय झाला. त्यातले वास्तव मनाला भिडनारे होते. काही पुढारी मंडळींना त्या निष्पाप भगिनीचे बोलणे नको इतके लागले. तिचे मत हे आजच्या तमाम मध्यवर्गीयांचे प्रातिनिधीक मत आहे, हे समजून घ्या. कोरोना च्या टाळेबंदीत जे जे कोणी भरडले गेले त्यात खरी झळ कोणाला बसली आहे, तर तो ७० टक्के मध्यवर्ग. बिचाऱ्याची अवस्था सांगताही येत नाही आणि गपही राहावत नाही. त्या महिलेने अगदी निष्पाप भावनेने तिची आणि ओघानेच सामान्य कुटुंबांची व्यथा कथन केली. दीड महिना सारे काही बंद असल्याने कोंडमारा झाला, तेच तिने सांगितले. बंदच्या काळात गरिबाला मदत मिळते. मोफतचे धान्य, भाजी, दोन वेळचे जेवण मिळते. झोपडीधारकांनाही महापालिका, सरकार देते. बांधकाम मजूर, बेघर, संघटीत कामगार, मोलमजुरी करणाऱे, मोलकरणी यांना सामाजिक दायित्व म्हणून सगळे मदत करतात. पालिका रोज ४०-५० हजार लोकांना भोजन देते. संस्था संघटना, कारखानदार धान्य, तेल, मीठासह सगळे देतात.

पैसेवाले कसेही तग धरून राहतात. श्रीमंत वर्गाला आणखी चार काय सहा महिने व्यवहार बंद राहिले तरी तितकासा फरक पडणार नाही. प्रश्न आहे तो मध्यवर्गाचा. फ्लॅटमध्ये राहतो, पण बँकेचा हप्ता भरतो, किराणा व दूध-भाजीपालासुध्दा महिन्यासाठी उधार आणतो. स्वतःची इभ्रत म्हणून तो कोणाकडेही हात पसरत नाही. त्यामुळे कितीही अडचण, तंगी असली तरी एक वेळ उपाशी झोपतो मात्र स्वाभिमान म्हणून लाचार होत नाही. आज हा मध्यवर्ग पूरता पिचला आहे. मागचा महिना भागवला. साठवलेले पैसे मोडून महिना गेला. आता दुकानदार उधार देत नाही की दुधवाला. शाळेची फी भरायची, मुलांना क्लास लावायचा, आई-वडिलांना दवाखान्यात न्यायचे तर खिसा रिकामा. कोरोना मुळे मंडळी खंक व्हायची वेळ आली नव्हे झाली आहेत. आता हे सहनशिलतेच्या पलिकडे गेल्याने एका महिलेने ते दुखणे फक्त बोलून दाखवले. तिची मुस्कटदाबी सुरू झाली. हे बरोबर नाही.

आज संकटात जसे कारखानदार आहेत तसे कामगारसुध्दा आहेत. शहरात साडेतील लाख सामान्य कामगार हा मध्यमवगर्गीयच आहे. अगदी केशकर्तनालया पासून धोब्यापर्यंत सगळ्यांचे धंदे बसले. किराणा, दूध, भाजी शिवाय दुसऱ्या धंद्याला परवानगी नाही. पर्याय म्हणून अनेकांनी वर्कशॅपला कुलूप लावले आणि भाजी विकायला सुरवात केली. गणेशोत्सवात दोन पैसे मिळण्याची शक्यत कमी दिसते म्हणून कुंभारानेही दुधाचा रतिब घालायला सुरवात केली. एक पंप्चर काढणाऱ्या दाक्षिणात्य बांधवानेही पोट भरण्यासाठी भाजीचा ठेला लावला. वाणगीदाखल हे काही नमुणे आहेत. शेवटी पोटाची आग विझवण्यासाठी हातपाय हलवावेच लागणार. लोक काय म्हणतील म्हणून हा पांढरपेशी माणूस कुठेही मोफत जेवण मिळत असले तरी तिकडे फिरकत नाहीत. त्यांची कुठली संघटना नसते, की जी किमान महिन्याचे राशन देईल. होच दुखणे त्या बाईंनी मांडले. पोलिसांनी तिला बालावून समज दिली, मदत देण्याचे नावगाव काही नाही. त्या भगिनीच्या मुखातून राजकीय मंडळी किती मतलबी असतात, मते मागायला येतात आणि अशा प्रसंगात तोंड लपवतात वगैरे वगैरे जळजळ बाहेर आली. निवडणुकीत दोन-पाचशे रुपयेला मते खरेदी करतात, असेही त्या म्हणाल्या. तसे कोरोना संकटाशी याचा संबंध नाही, पण संताप बाहेर पडला. आता १७ मे पर्यंत टाळेबंदी वाढली. कदाचीत पुढे जून पर्यंत चालेल. ज्यांची उपासमार होते ते बोलू लागलेत. म्हणतात कोरोनाने मरायच्या एवजी उपासमारीने जनता मरेल. ही खदखद घरघरात आहे. बंदमध्ये अनेकांच्या नोकरीवर गदा आली, पगार रखडले, वेतन कपात झाली, घरभाडे थकले. ज्याचे जळते त्याला कळते. ही खदखद आहे. संघटीतपणे हा उद्रेक बाहेर आला तर कठिण होईल. ती भगिनी हे एक निमित्त आहे. राजकीय मंडळी प्रशासनाने तत्काळ दखल घेतली पाहिजे अन्यथा अनर्थ घडेल. २७ लाखाच्या या शहरात आज किमान १८-२० लाख लोक या वर्गात मोडतात. ते खूप जाणकार आहेत. प्रसंगी डोक्यावर घेतात आणि वेळेला कोणी उपयोगी पडत नाही असे दिसले की तक्त उलथवू शकतात. कोरोना हे फक्त निमित्त आहे. एका ठिणगीचा भडकाही होऊ शकतो. मध्यमवर्गाचा अबोला खूप महाग पडतो. त्यामुळे या भगिनी जे बोलल्या ते सकारात्मक अंगाने घेतले पाहिजे. केंद्रात, राज्यात आणि नंतर महापालिकेत भाजप सत्तेवर आली त्यालाही कारण हाच वर्ग आहे. मोदींना हे कळते, पण त्यांच्या समर्थकांना उमगत नाही हे दुदैव.