विधानपरिषदेसाठी विदर्भात काँग्रेसमध्ये रस्सीखेच

0
395

नागपूर, दि. ३ (पीसीबी) : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्यांच्या मतांवरुन विधानपरिषदेवरील आमदारांची निवड होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं, त्यामुळे क्षेत्रीय समतोल राखत काँग्रेसच्या वाट्याची जागा विदर्भातील इच्छुकांना मिळावी, यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

लॉकडाऊनमुळे दिल्लीवारी शक्य नसली, तरी विदर्भातील काँग्रेसच्या इच्छुक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इच्छुकांकडून विदर्भातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. विदर्भातील काँग्रेसचे इच्छुक ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक,माजीआमदारडॉ. आशिष देशमुख,प्रवक्ते अतुल लोंढे, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी नेत्यांची नावे इच्छुकांच्या स्पर्धेत आहेत.

लॉकडाऊनमुळे त्यांना दिल्लीवारी करता येत नाही, पण संधी मिळावी म्हणून प्रत्येक इच्छुकाने आपापल्या नेत्यांच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला पाच जागा येऊ शकतात, त्यातील काँग्रेसच्या वाट्याला मिळालेली जागा विदर्भातील इच्छुकाला मिळावी, अशी विदर्भातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. आता कोणाच्या पारड्यात पसंतीचं मत पडणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.