विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हद्दपार करा – सहकारमंत्री देशमुख

0
555

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन सहकारमंत्री व पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले. वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा सोमवारी (दि. २९) झाला. त्यावेळी देशमुख बोलत होते.

त्यावेळी कामगार राज्यमंत्री व पिंपरी-चिंचवडचे प्रभारी बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उमा खापरे,  पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, शहर संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील २४० आणि पुणे जिल्हा ग्रामीणचे ७० शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत २२० जागांवर विजय मिळवायचा आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याच्या जिद्दीने कामाला लागावे. येणारा काळ हा भाजपचा सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवावेत. जनतेत मिसळून काम केल्यास निवडणुकीत आपला विजय नक्की आहे. असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.