प्रणिती शिंदे भाजपकडून रिंगणात उतरणार ?

464

सोलापूर, दि. २० (पीसीबी) : सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे आत्तापासूनच जोरदारपणे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून येथे खुद्द पक्षातच पसंती आणि नापसंतीच्या मोठ्या वावड्या उठल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय वारसदार तसेच, विधानसभेला हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी खुद्द पक्षातूनच तीव्र विरोध होत आहे, दुसरीकडे, सुशीलकुमार शिंदे यांनीच या वेळेची लोकसभा लढवावी, यासाठी पक्षातूनच कार्यकर्त्यांचा दबाव वाढताना दिसत आहे.

अशातच येथील राजकारणाला वेगळे वलय, अस्तित्व असलेल्या विकासाभिमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या हाती ‘कमळ’ देऊन सोलापूर लोकभेच्या या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपाकडून वेगळ्या राजकीय डावपेचाची शक्यता वर्तवली जात आहे. प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीला पक्षामधील होत असलेला विरोध लक्षात घेता, भाकरी फिरवून याच मुद्द्याच्या आधारे प्रणिती शिंदे यांना भाजपात घेण्याचा ‘मास्टरस्ट्रोक’च्या हालचाली या पक्षात होत असल्याची चर्चा होत आहे.

विशेषकरून, वयाची ऐंशी गाठणाऱ्या सुशीलकुमारांनी सोलापूर लोकसभेची जागा स्वत: अडवून न ठेवता, ती तरुणाईसाठी मोकळी करून द्यावी. या जागेवर त्यांची राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची उमेदवारी घेण्यास भाग पाडून येथे ‘विकासाचे कमळ’ फुलवावे, अशी धारणा आणि विचारप्रवाह भाजपाच्या गोटात आहे. तसे प्रयत्नही भाजपाच्या वर्तुळात सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होण्याच्या दृष्टीने त्यांचे मन वळवण्यासाठी तसेच मध्यस्ती करण्यासाठी कोणता ‘वजनदार’ चेहरा चालेल, याची चाचणी भाजपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चालू आहे. वास्तविक काँग्रेस हा आमचा ‘श्वास’ आणि ‘ध्यास’ आहे, आपण काँग्रेस पक्ष कधीच सोडणार नाही, आपला भाजप प्रवेश कधीच शक्य नाही. उलट या पक्षाकडूनच तशा वावड्या उठवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे.