बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न

0
216

पुणे, दि. २० (पीसीबी) – बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या घटनेत महिला बचावली असून पसार आराेपीचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी रमजान खलील पटेल (वय ६०) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रमजान पटेल आणि महिलेचा परिचय आहे. त्याने २०१८ मध्ये पीडित महिलेला फिरायला जाऊ, असे सांगून बार्शी येथे नेले होते. त्यावेळी त्याने महिलेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेने पटेलच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बलात्काराचा खटला सोलापूर न्यायालयात दाखल असून सुनावणी सुरू आहे. रमजान काही दिवसांपूर्वी महिलेच्या घरी आला होता. त्याने महिलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले. महिला वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या आवारात तिला गाठले. गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावून तिला शिवीगाळ केली. तिच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न रमजानने केला. पसार झालेल्या रमजानचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काकडे तपास करत आहेत.