राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडला नसल्याने प्रशांत शितोळेंचा अर्ज ठरला बाद

0
420

पक्षाकडूनच घात केल्याने कार्याध्यक्षपदाचाही दिला राजीनामा

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी बाद ठरल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी तडकाफडकी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच दिली.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे यांना मैदानात उतरविले होते. पक्षाने त्यांना उमेदवारी देखील दिली होती. शुक्रवारी (दि. ४) दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्जासोबत पक्षाने एबी फॉर्म जोडला नसल्याने अर्ज छानणीत त्यांचा अर्ज बाद ठरला.

राष्ट्रवादीकडून घात झाल्याने नाराज झालेल्या प्रशांत शितोळे यांनी तडकाफडकी राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. या सर्व प्रकारामागे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचाच हात असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. मात्र, यापुढे त्यांची भुमिका काय असणार, याबाबत विचारले असता, कार्यकत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.