चिंचवडमध्ये आता रथीमहारथींची नावे स्पर्धेत

0
737

– जगताप कुटुंबातून आश्विनीताई की शंकरशेठ
– राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर यांच्या पुढे काय वाढून ठेवले

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेली चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा विषय आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून रथीमहारथींनी तयारी सुरू केल्याने स्पर्धा वाढली असून ही निवडणूक अपेक्षेपेक्षा भलतीच रंगतदार होण्याची लक्षणे दिसत आहेत.
निवडणूक आयोगाने घोषणा केल्यापासून इच्छुकांनी चाचपणी सुरू केली. सुरवातीला आमदार जगताप यांच्या पत्नी आश्विनी यांचेच नाव भाजपमधून पुढे आले. पत्नी म्हणून त्यांना खूप मोठी सहानुभूती असल्याने कदाचित विरोधक उमेदवार देणार नाहीत आणि निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. नंतर जगताप कुटुंबातूनच आश्विनी यांच्या ऐवजी आमदारांचे धाकटे भाऊ शंकर यांचे नाव आले. त्यावर शिक्कामोर्तब होणार असे दिसताच विरोधकांकडून तसेच भाजपमधूनही इच्छुकांची संख्या वाढली आहे. फक्त आश्विनी असल्या तरच बिनविरोध होण्याची शक्यता होती. शंकर यांना ती सहानुभूती कदापि मिळणार नाही, असा अंदाज आल्याने राष्ट्रवादीतून सहा, भाजपमधून तीन, शिवसेनेतून एक असे तब्बल दहा इच्छुक चर्चेत आले.
आता या सर्व इच्छुकांची नेमकी परिस्थिती काय आहे याबाबत आपण नावानिशी जाणून घेऊ या…

१) आश्विनी जगताप (भाजप) –
श्रीमती आश्विनी यांचे नाव आता इच्छुकांच्या यादीत अग्रभागी आहे. स्वतः कधी निवडणूक लढवलेली नाही, मात्र घर प्रपंच सांभळतानाच राजकारणाचे बाळकडून त्यांना पती आमदार जगताप यांच्याकडून मिळाले. आमदार जगताप यांच्या ३५ वर्षांच्या कारकिरर्दीत ३२ वर्षे सावलीसारख्या उभ्या असल्याने प्रत्येक घडामोडीच्या त्या साक्षिदार आहेत. तीन वर्षांपासून जगताप हे आजारी पडल्यानंतरच्या काळातही त्यांनी सुरू केलेले सामाजिक उपक्रम आश्विनीताईंनी कायम ठेवले आणि जाणीवपूर्वक सहभागा वाढला. पवनाथडी, आरोग्यजत्रा, महिला बचतगटाच्या कार्यक्रमांतून त्या मुख्य संयोजक, प्रमुख अतिथी म्हणून त्या असतं. आमदारांच्या नंतर त्यांच्या कार्याचा वसा चालवायचा हे त्यांनी ओळखले आणि तेव्हाच वाटचाल सुरु केली. प्रथम त्यांच्या मनाची तयारी नव्हती, पण आता त्यांचेच नाव उमेदवारीसाठी पक्षाकडे आल्याने त्या प्रबळ दावेदार समजल्या जातात. त्यांना डावलून त्यांचे धाकटे दिर शंकर यांना उमेदवारी द्यायचा भाजपमधील एका गटाचा प्रयत्न आहे. सहानुभूतीच्या मुद्यावर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांचेच नाव अंतिम होईल, असा अंदाज आहे. अत्यंत घरंदाज, सालस प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे, पण घरातून होणारा विरोध हेच त्यांच्यापुढचे मोठे आव्हान असणार आहे.

२) शंकर जगताप (भाजप) – आमदार जगताप यांचे धाकटे बंधू आणि माजी नगरसेवक अशी त्यांची ओळख. आमदारांचे सर्व व्यावसाय तेच सांभाळत असतं. मावळ लोकसभेतून आमदारांचे नाव चर्चेत असताना त्यांनी पर्याय म्हणून शंकर यांचे नाव पुढे केले होते. शाश्वती नसल्याने शंकर यांच्या उमेदवारीला नकार आला. आमदार खासदार झाल्यावर खाली चिंचवडमध्ये शंकरशेठ विधानसभेला असतील अशीही अटकळ कायम असायची. त्याचाच एक भाग म्हणून भाऊंचे आजारपण वाढत गेले आणि त्यानंतर चिंचवड विधानसभा प्रमुख म्हणून भाजपने शंकरशेठ कडे जबाबदारी दिली. शंकरशेठची तेव्हापासून तयारी आहे. महापालिकेच्या आणि विशेषतः चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील बहुतांश सार्वजनिक कार्यक्रमात आमदारांच्या ऐवजी तेच प्रतिनिधी म्हणून असतं. निवडणूक लढायची आहे हे लक्षात ठेवून त्यांनी मोर्चेबांधनी, गाठीभेटी सुरू केल्या. मितभाषी असलेले शंकरशेठ भाऊंचाच कारभार करत राहिल्याने राजकारणाचा त्यांचा अनुभवही बऱ्यापैकी आहे. मात्र, त्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आणि तेव्हापासूनच पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरीलही अनेक विरोधकांनी डोके वर काढायला सुरवात केली. आता भाजपमधील एक मोठा गटच उभा ठाकल्याने तिथे शंकरशेठची परिक्षा आहे, काळ कठिण आहे. खुद्द पिंपळे गुरव मधून त्यांच्याच भाऊबंदातून आमदारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नवनाथ जगताप यांनीच जाहीरपणे शंख फुंकल्याने खळबळ आहे. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, निलख, वाकड, काळेवाडी, रहाटणी या भागाने आमदारांना शेवटपर्यंत साथ दिली. आता शंकरशेठ यांना घरातूनच आव्हान मिळाले. ज्यांच्या भरवशावर त्यांनी उडी घेतली तिथेच घात झाला. हे बंड शमविण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी, वाकड, रहाटणी भागातून गेल्या निवडणुकित राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप हे जवळपास बरोबरीत चालले होते. आता ते मतदान आपल्या बाजुला वळविण्याचे कठिण काम शंकरशेठला करायवे लागणार आहे.

३) राहुल कलाटे (शिवसेना) – महापालिकेत आई-वडिल आणि नंतर स्वतः दोन वेळा वाकडचे प्रतिनिधीत्व केलेले राहुल कलाटे हे आजच्या घडिला सर्वात प्रबळ जगताप विरोधक समजले जातात. एकेकाळी आमदारांचे साथीदार आणि कायम त्यांना साथ कऱणारे कलाटे नंतर त्यांच्या विरोधात गेले. आमदार जगताप यांची इतकी जरब होती की त्यांच्या विरोधात `ब्र` शब्द काढण्याची हिंमत कोणात नव्हती त्यावेळी कलाटे यांनी दंड थोपटले. चिंचवड विधानसभेला २०१४ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात ६५ हजार आणि २०१९ मध्ये १ लाख १२ हजार इतकी भरघोस मते कलाटे यांनी घेतली होती. सलग वेळा लढले. आमदार जगताप यांचा पाडाव करायचाच म्हणून गेल्यावेळी सगळ्या विरोधकांनी कलाटे यांच्या पाठिशी ताकद उभी केली होती. तब्बल १ लाख १२ हजार मते मिळाल्याने स्वतः आमदार जगतापसुध्दा आचंबित झाले होते. आता तिसऱ्यावेळी कुस्ती चितपट करणार याचा आत्मविश्वास कलाटे यांना आणि त्यांच्या समर्थकांना असल्याने अंगाला तेल लावून ते मैदानात उतरलेत. स्वतः कलाटे यांचे वाकड पंचक्रोशित मोठे वर्चस्व आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू, आक्रमक, रोखठोक प्रतिमा आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. ते स्वतः शिवसेनेतून इच्छुक असले तरी तगडे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीतूनही त्यांचे नाव घेतले जाते. मुळात ही जागा राष्ट्रवादी लढणार की शिवसेना हे ठरलेले नाही. कलाटे यांचे नाव दोन्हीकडे चर्चेत आहे, पण उद्या शिवसेनेतून उमेदवारी जाहीर झालीच तर राष्ट्रवादीचे लोक मनापासून साथ देतील याची शाश्वती नाही. त्यातच शिवसेनेच्या चिन्हाचा घोळ अजून कायम आहे.

४) भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस) – चार टर्म नगरसेवक असलेले भाऊसाहेब भोईर हे आतापर्यंत केव्हाच आमदार व्हायला पाहिजे होते इतके कार्याने आणि अनुभवाने ते मोठे आहेत. शरद पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, नंतर अजित पवार असे आजवर सर्वच नेत्यांचे मर्जीतले असूनही त्यांना कुठलेही पद मिळाले नाही. त्यांच्या मागून आलेले स्थायी समिती अध्यक्ष झाले, महापौर झाले, आमदार, खासदार झाले मात्र, भाऊसाहेबांना पदांनी कायम लकावणी दिली.
खासदार श्रीरंग बारणे, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, विलास लांडे, संजोग वाघेरे, आझमभाई पानसरे, योगेश बहल अशा सर्व रथी महारथींच्या बरोबरीतले हे अत्यंत सक्षम, मुरब्बी नेतृत्व. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मनात आहे ते तोंडावर बोलण्यामुळे थोडक्यात अत्यंत स्पष्टवक्तेपणामुळे भोईर यांचे आजवर खूप मोठे नुकसान झाले. सर्वच पक्षांत त्यांचे मित्र आहेत ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. राजकारणात नाही पण शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा सिहांचा वाट आहे. भाऊसाहेब २००९ मध्ये काँग्रेसकडून चिंचवडमधून उमेदवार होते. त्यावेळी अपक्ष आमदार जगताप यांना ७८ हजार, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ७२ हजार आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे भोईर यांना अवघी २४ हजार मते होती. काँग्रेसमधून यश मिळत नाही म्हणून ते राष्ट्रवादीत आले आता पुन्हा आमदारकीची संधी त्यांना दार ठोठावते आहे. भोईर यांना चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, थेरगाव पर्यंतचा पट्टा हाताखालचा आहे, पण ५५ टक्के मतदार ज्या पिंपरी सौदागर, वाकड, सांगवी भागात आहे तिकडे मेहनत घ्यावी लागेल. नाव सर्वश्रुत आहे, पण आयटी चा मतदार नेहमी मोदींच्या नावाला मत देत असल्याने ती कोंडी फोडण्याचे आव्हान भोईर यांच्या समोर असेल.

५) नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – पिंपळे सौदागर मधून नाना काटे हे तीन वेळा राष्ट्रवादीतून नगरसवेक झाले. विरोधीपक्ष नेते आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ मध्ये चिंचवड विधानसभेला ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. जगताप, कलाटे यांच्या नंतर तिसऱ्या क्रमांकाची ४२ हजार मते त्यांना मिळाली होती. आता पुन्हा ते प्रबळ इच्छुक आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध जागा द्यायची नाही, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियातून थेट प्रचारालाही सुरवात केली आहे. भावी आमदार म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांची छबी रंगवली आहे. आयटी बहुल मतदारसंघातून म्हणजे भाजपला फेव्हर असणाऱ्या भागातून ते मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. एक सभ्य, सुसंस्कृत, संयमी नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. चार निवडणुकांचा अनुभव गाठिशी असल्याने राजकीय परिपक्वता अंगी आहे. भागातील मतदारांशी त्यांचा मोठा संपर्क आहे, पण मतदारसंघाच्या दुसऱ्या टोकाला त्यांना व्यक्ती म्हणून तितकेसे समर्थन नाही. चिंचवडगाव, रावेत, वाल्हेकरवाडी, थेरगाव या भागातील मतदार २० टक्के वाढला आहे तिकडे नाना काटे हे नाव पोहचलेले नाही, ते आव्हान आहे. राष्ट्रवादीतील जेष्ठतम् भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आणि वाकडचे शिवसैनिक राहुल कलाटे यांची मोट ते कशी बांधतात यावर त्यांचा पुढचा प्रवास अवलंबून आहे.

६) मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रावेत म्हणजे मोरेश्वर भोंडवे हे आजचे समिकरण आहे. तीन वेळा नगरसेवक झालेले भोंडवे हे शरद पवार, अजित पवार यांचे कट्टर समर्थक. आजवर मोठे कोणतेही पद मिळाले नाही. यापूर्वी अपक्ष म्हणून त्यांनी चिंचवड विधानसभेसाठी २०१४ मध्ये उमेदवारी केली होती. त्यावेळी चौथ्या क्रमांकाची १४ हजार मते घेतली होती आता पुन्हा लढायचे म्हणून नाव चर्चेत आहे. शहरातील सर्वात मोठे देणगीदार अशी त्यांची ख्याती आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असो वा अन्य कोणतेही सामाजिक कार्यक्रम, उपक्रम तिथे मोरेश्व भोंडवे हे नाव असते. चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी महोत्सवातील अन्नदानात सर्वात मोठा सहभाग त्यांचा असतो. शालेय विद्यार्थ्यांना, गोरगरिबांना आर्थिक मदत करत आल्याने लोकप्रिय आहेत. रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव या भागात ते प्रभाव टाकू शकतात. पण उर्वरीत पिंपळे गुरव, सौदागर, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडीच्या ६० टक्के मतदारांकडे पोहचण्याचे आव्हान आह. आर्थिक सक्षम असले तरी भोईर, काटे, संतोष बारणे या पक्षांतर्गत इच्छुकांना ते कसे शांत करतात यावर त्यांचे भवितव्य आहे. अर्थात शिवसेनेचे कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने महाआघाडीत ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तरच अन्यथा अपक्ष उमेदवारी परवडणारी नाही.

७) संतोष बारणे – मूळचे काँग्रेसचे नगरसेवक. नंतर राष्ट्रवादितून भाजपमधून आले आणि जिंकले. आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या संतोष बारणे आणि त्यांच्या पत्नी मायाताई बारणे यांचे नाव थेरगाव परिसरात मोठे आहे. खासदार श्रीरंग बारणे हे त्यांचे खांदानी विरोधाक असूनही थेरगावमध्ये संतोष बारणे यांनी वर्चस्व टिकवून ठेवले. भाजपमध्ये असताना माया बारणे यांना महापौर करतो, स्थायी समिती अध्यक्षपद देतो असे आमदार जगताप यांनी सांगत सांगत अखेर पर्यंत काहीच दिले नाही. माई ढोरे यांच्या महापौर पदाच्यावेळी माया बारणे यांचे नाव आघाडीवर होते, पण आमदारांनी आपले वजन सर्वात जेष्ठ म्हणून माई ढोरे यांच्या पारड्यात टाकले. नंतरच्या काळात संतोष बारणे व माया बारणे यांनी आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली. आता संतोष हे चिंचवड विधानसभेसाठी इच्छुकांच्या यादीत आहेत. थेरगाव हा त्यांचा बालेकिल्ला असल्याने तिथे ताकद आहे, पण पिंपळे सौदागर, वाकड तसेच चिंचवडगाव या मतदारांचे काय हा प्रश्न आहे. आजवर महापालिका वगळता विधानसभेसारखी मोठी निवडणूक लढविण्याचा कुठलाही अनुभव नाही. अत्यंत मनमिळावू स्वभाव, कार्यक्षम नगरसेवक पती-पत्नी हीच एक जमेची बाजू आहे. निवडणूक लढवियचची तर भोईर, काटे, भोंडवे अशा दिग्गज मंडळींना ओव्हरटेक करुन जायचे आव्हान संतोष यांच्या पुढे आहे. त्यांचे पारंपारीक विरोधक असलेले भाऊबंदकीतील खासदार बारणे हे आता शिंदे गटात गेल्याने ठाकरे यांची शिवसेना संतोष यांना साथ देणार का हासुध्दा प्रश्न आहे.

८) नवनाथ जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) – आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३० वर्षांतील साथीदार आणि जगताप घराण्यातील एक धडाडीचे नगरसेवक अशी पंचक्रोशितील प्रतिमा असलेले नवनाथ जगताप यांचेही नाव राष्ट्रवादीच्या यादीत आहे. तीन वेळा नगरेसेवक झालेले नवनाथ यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. शिक्षण मंडळ सभापती आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष पदाचा अनुभव आहे. आमदारांची सावलीसारखी साथ कऱणारे नवनाथ यांना कुठेतरी डावलले गेल्याची खंत आहे. यापूर्वी महापालिकेला आमदारांच्या आदेशा विरोधात अपक्ष लढवून त्यांनी सर्वाधिक मतांनी निवडणूक जिंकली म्हणून पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी मध्ये हिरो ठरले. भाजप लाटेतही ते अपक्ष जिंकले. आमदारांना तोंडावर चूक असेल तर चूक आहे, असे सांगण्याचे धाडस कऱणारे नवनाथ यांची लोकप्रियता मोठी आहे. शंकर जगताप यांच्या विरोधात उमेदवारी करायचीच असा त्यांचा निर्धार आहे आणि परिसरातूनही त्यांना मोठी साथ आहे. अफाट जनसंपर्क हे त्यांचे भांडवल आहे. भाजपला आणि प्रामुख्याने जगताप कुटुंबात सुरुंग लावायची क्षमता असल्याने त्यांचे महत्वा वाढले. अद्याप नवनाथ यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव हाच मोठा चर्चेचा विषय आहे. आजवर कधी विधानसभा लढली नाही, पण यापूर्वी आमदार जगताप यांची निवडणूक यंत्रणा हाताळली आहे. राहुल कलाटे यांच्या निवडणुकीत त्यांना पाठबळ दिल्याने नवनाथ यांचा आत्मविश्वास बळावला आहे.

९) शत्रुघ्न काटे (भाजप) – पिंपळे सौदागर मधून तीन वेळा नगरसेवक झालेले शत्रुघ्न काटे यांचेही नाव भाजमधून पर्यायी उमेदवार म्हणून चर्चेत आहे. जगताप कुटुंबियांत एकमत झाले नाही तर काय हा प्रश्न भाजपपुढे असल्याने शत्रुघ्न काटे हे तडजोडीचे नाव म्हणून पाहिले जाते. स्वतः काटे हे यशस्वी उद्योजक आहेत. गेल्या पंचवार्षीकमध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष करतो म्हणत त्यांनासुध्दा डावलण्यात आले. आपली क्षमता असूनही केवळ भविष्यात चिंचवड विधानसभेला स्पर्धक नको म्हणून संधी दिली नाही, ती अन्यायाची भावना काटे यांना सलते. केवळ त्यामुळेच आता भाजपमधून काटे यांना सहानुभूती आहे. मितभाषी, सुस्वभावी, यंग, डायनॅमिक, हेल्थ कॉन्शस अशी प्रतिमा असलेल्या शत्रुघ्न यांची आयटीयन्स व्होटरमध्ये क्रेझ आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नेतृत्वाची धमक आहे, पण ती आजवर सिध्द करता आलेली नाही म्हणून ते मागे राहिले. संयमी आणि कचखाऊ स्वभाव असल्याचाही त्यांना तोटा होतो. आजवर कधी किलर इन्स्टिंग्ट दाखवला नसल्याने सक्षम, तगडे असूनही स्पर्धेत पुढे मागे मागे राहिले. आता भाजप मधून जगताप कुटुंबियांचा वाद मिटला नाहीच तर शत्रुघ्न काटे अर्थात बापूंचीसुध्दा लॉटरी लागू शकते.