… म्हणून चिंचवड पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची | थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
935

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होत चालल्याने ती कदापि बिनविरोध होणार नाही ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण ही पोटनिवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होऊ लागली आहे. असंख्य नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचीच ती लढाई ठरणार आहे. पहिला अत्यंत ठळक मुद्दा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकित पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार की नाही याचा निकालच या पोटनिवडणुकितून स्पष्ट होणार आहे. शहरात अजितदादा पवार यांचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित होणार की नाही तेसुध्दा इथेच निश्चित होणार. शरद पवार आणि अजित पवार यांच्याच नव्हे तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई असणार आहे. दीड वर्षांनी होणाऱ्या मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आणि नंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे भावी आमदार हे राष्ट्रवादीचे होऊ शकणार की नाही त्याचाही अंदाज या पोटनिवडणुकितूनच बांधता येणार आहे. भाजपचे आता सर्वेसर्वा म्हणावेत असे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या पद आणि प्रतिष्ठेचाही हा प्रश्न आहे. विरोधी बाजुला राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेला नव्याने उभारी देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या शहराध्यक्ष पदाचे यश अपयशाची मोजणी याच निकालावर होणार आहे. आगामी काळातील राजकारण राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस असे महाआघाडीचे असणार की कुरघोडीचे स्वतंत्र राहणार त्याचेही उत्तर या पोटनिवडणुकितून मिळणार आहे. सर्वात शेवटी भाजपचा खुंटा शहात मजबूत करणाऱ्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव, वारसा यापुढे चालणार की नाही तेही समजणार आहे. कारण `राजा का बेटा राज नही बनेंगा`, म्हणत राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी रणशिंग फुंकले आहेच. शिवसेना आणि सर्व विरोधकांची ताकद म्हणून राहुल कलाटे यांना गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, आता पुन्हा ती जादू चालणार का तेसुध्दा पहायचे. शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्वच शून्य होण्याच्या स्थितीत असल्याने आता पुढे काय, त्याचाही निकाल घेता येईल. जख्ख म्हातारी झालेली काँग्रेस आता शहरात असून नसल्यासारखी आहे आणि पोटनिवडणुकिच्या निमित्ताने ती पुन्हा लुकलुकणार की कायमचे विसर्जन होणार तेसुध्दा पहायचे आहे. म्हणून चिंचवड विधानसभेची निवडणुक ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कोणाकडे जाणार त्याचा कौल देणारी असेल.

महापालिकेत राष्ट्रवादीचे पुर्नगमण होणार का ?
महापालिकेची निवडणूक कधी होणार ते आताच निश्चित सांगता येत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परवाचा मुंबईचा दौरा हा मुंबई महापालिका निवडणुकिसाठीच होता, हे पाहता मार्च-एप्रिलमध्य या निवडणुका लागतील असा अंदाज आहे. राज्यातील २६ महापालिका, २८ जिल्हा परिषदा आणि ४५० वर नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकासुध्दा बरोबरीने होणार आहेत. म्हणजेच आगामी विधानसभेची ही रंगीत तालिम असेल. आणि अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच तर, कदाचित राज्यात मध्यावधी निवडणुकासुध्दा जाहीर होऊ शकतात. असे सगळे वातावरण असल्याने राजकारणाची पुढची दिशा कशी असेल याचे मार्गदर्शन चिंचवडच्या पोटनिवडणुकितून होणार आहे. मुळात २०१७ मध्ये एकहाती सत्ता असलेल्या अजितदादा पवार यांना अक्षरशः पदच्यूत करुन राष्ट्रवादीची सत्ता भाजपने हिसकावून घेतली. आता ती पुन्हा मिळवायचीच हे दादांचे आणि राष्ट्रवादीचे ध्येय आहे. ज्यांनी हा चमत्कार केला ते आमदार जगताप काळाच्या पडद्याआड गेले. आता तसे पुन्हा राष्ट्रवादीसाठी रान मोकळे आहे. पालिकेतील सत्तासुंदरी खुणावते आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत आणि ते वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीच चिंचवडची पोटनिवडणूक पोषक आहे. महापालिकेचे संभाव्य इच्छुक आताच जोमाने कामाला लागलेत. रणशिंग फुंकलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मध्येच माणुसकीचे कारण सांगत ही निवडणूक बिनविरोध करा, असा साप सोडून दिला. ग्राम्य भाषेत याला दुधात मिठाचा खडा टाकणे किंवा खंडिभर वरणात —- चा प्रकार, असे म्हणतात. कारण चिंचवडची पोटनिवडणूक झाली नाहीच तर पुन्हा भाजपला पध्दतशीर चाल मिळणार. आमदार बनसोडे यांना गेल्या विधानसभेला जगताप यांनी अप्रत्यक्ष मदत केली होती, त्या उपकाराची परतफेड म्हणून ठिक. पण त्यात राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात येणार असेल तर हजारवेळा पवारांना विचार करावा लागेल. पूर्ण बाजी पलटवणारी ही खेळी आहे. हवा कोणत्या दिशेने वाहते हे लक्षा आल्याने तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पोटनिवडणुकिचा जोश संचारलेला असताना आमदार बनसोडे वेगळाच सूर आळवतात. मुळात आता त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

अजितदादा पवार यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे दोनवेळा सांगितले. राष्ट्रवादीतून भाजमध्ये गेलेल्या नेत्यांनीच अजित पवार यांचा दारुण पराभव केला. मावळ लोकसभेला पार्थ पवार यांच्या पराभवाचे शल्य आहे. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे मनसोक्त आरोप करुन भाजप सत्तेवर आली आणि त्यांनी महापालिका अक्षरशः धुतली. आता ते सगळे माफ करायचे की लोकांना स्वच्छ पर्याय द्यायचा ते राष्ट्रवादीला ठरवायचे आहे. जगताप यांचे राष्ट्रवादीसाठी मोठे योगदान आहे म्हणून त्यांच्या उपकाराची परतफेड करायची वेळ असल्याचा लंगडा युक्तीवाद केला जातो. महाभारत ज्यांनी वाचले आणि शरद पवार ज्यांना कळले ते असे बोलणार नाहीत. कारण रणांगण, राजकारणात लढायचे असते. लांब नका जाऊ, सत्ता हातात ठेवण्यासाठी आता खुद्द जगताप यांचाच सख्खा भाऊ आपल्या विधवा वहिनी आश्विनीताईंना साईडट्रॅक करु पाहतोय. भाऊंच्या चितेचा अग्नी शांत होत नाही तोच भाजपच्या इच्छुकांनी पुढचे आमदार कोण यावर चर्चा सुरू केली होती. राजकारण आणि कौटुंबिक संबंध यात फरक आहे. म्हणून तर राजकीय वैर असूनही शरद पवार, अजित पवार जगताप कुटुंबाचे सांत्वनासाठी घरी गेले होते.

राष्ट्रवादीने भाजपला बिनविरोध द्यावे, अशी सुचना करणारे हे विसरतात की, पंढरपूर, देगलूर विधानसभा पोटनिवडणुकित भाजपने तोच राजधर्म पाळला नाही. मुंबईत शिवसेनेला झुकायला भाग पाडले. गेल्या ५५ वर्षांत शरद पवारांनी असे दुधखुळे राजकारण केले नाही म्हणून राष्ट्रवादी टीकली अन्यथा काँग्रेस झाली असती. चिंचवडमध्ये काय होणार हे अधिक सांगण्याची गरज नाही. भाजपला शहरात पर्यायी नेतृत्व दिसत नाही आणि महापालिकेला काय होणार याची चिंता वाटते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले २५ – ३० नगरसेवक आता पुन्हा राष्ट्रवादीत यायच्या मूडमध्ये आहे. कारण त्यांनाही इथे वाली राहिलेला नाही. उद्या चिंचवड राष्ट्रवादीकडे गेला तर आगामी काळात महापालिका आणि नंतर भोसरी विधानसभेलासुध्दा आव्हान निर्माण होणार. मावळ लोकसभेवर राष्ट्रवादी दावा सांगणार. शिरुर लोकसभा सोपी जाणार. एकूणच भाजपचे शतप्रतिशत पिंपरी चिंचवडचे स्वप्न भंगणार. ही साखळी आहे आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही त्यातली एक कडी आहे. आता निर्णय नेत्यांनी घ्यायचाय.

चिंचवडची पोटनिवडणूक जिंकली तर भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे हे शहराचे पुढचे नेते होतील. दुर्दैवाने ती हारलीच तर महापालिकेला भाजपला उमेदवार शोधावे लागतील, मिळणे कठिण होईल. आमदार लांडगे हे शहराचे नव्हे तर फक्त भोसरी पूरतेच मर्यादीत नेते आहेत, हे पोटनिवडणूक निकालातून सिध्द होईल. जर का चिंचवड राष्ट्रवादीने जिंकली तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. पुढच्या महापालिकेसाठी गव्हाणे सांगतील ते उमेदवार असतील. भाजपमध्ये कुंपणावर असलेले पटापट राष्ट्रवादीत उड्या घेतील. आणि आगामी काळात भोसरीमधून आमदार लांडगे यांच्या विरोधात विधानसभेला एक तगडा सक्षम पर्याय म्हणून गव्हाणे यांचे नाव स्पर्धेत येईल. हे सगळे जर तर आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे जगताप यांच्या बरोबर सलोख्याचे संबंध होते आणि भविष्यात ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. आमदार बनसोडे बिनविरोधची टीमकी लावता ते त्यांच्या अस्तित्वासाठी. कधी महापालिकेत नाही, कुठल्या बैठकांना नाही की कार्यक्रमांनासुध्दा हजेरी न लावणारे आमदार बनसोडे यांची भूमिका पक्ष विरोधी का याचे तेच मर्म आहे. चिंचवड राष्ट्रवादीने जिंकलेच तर, त्यांचे महत्व एकदम कमी होणार. आगामी विधानसभेला त्यांच्या ऐवजी दुसरा भर भक्कम पर्याय राष्ट्रवादीला मिळाला आहे म्हणून तर त्यांची फडफड सुरू आहे. चिंचवडचे अंतरंग असे उलगडले की, बिनविरोधच्या बातम्या कशा पेरल्या जातात, बनसोडे असे का बोलतात याचे सगळे धागेदोरे बरोबर जुळतात. पुढच्या आठवड्यात वातावरण आणखी स्पष्ट होईल, तोवर वाट पाहू या.