पुरग्रस्त भागातील १०० शाळा भाजप दुरूस्त करणार, भाजप लोकप्रतिनिधींनी दिली ५१ लाखांची मदत

0
714

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – महापुरामुळे कोल्हापुर, सांगली व सातारा भागातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा १०० शाळांची दुरूस्ती भारतीय जनता पक्ष करणार असून त्यासाठी राज्यभरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींना एक महिन्याचे वेतन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यासाठी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या लोकप्रतिनीधींनी ५१ लाखांची मदत जमा केली आहे. अशी माहिती महसुल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांचा आढावा महसुल मंत्री पाटील यांनी शुक्रवारी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

श्री पाटील म्हणाले की, पुरामुळे अनेक शाळांच्या संरक्षण भिंती कोसळल्या असून स्वच्छतागृह तुटली आहेत. अशा १०० शाळा भाजपच्या वतीने दुरूस्त केल्या जाणार आहेत. राज्यभरात भाजपच्या २० हजार लोकप्रतिनिधी असून त्यामध्ये ११ हजार सरपंचच आहेत. त्यासाठी या सर्वांना एक महिन्याचे वेतन भाजपच्या अपदान या खात्यात देण्याचे आवाहन केले आहे. तर शहरातील जमा केल्या ५१ लाखांच्या मदतीचा धनादेश माझ्याकडे जमा केला आहे.

१०० तालमी होणार दुरूस्त

भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पैलवान असून त्यांनी पैलवानांच्या हिताचा विचार करत पुरग्रस्त भागातील १०० तालमी आमदार लांडगे हे स्वखर्चाने दुरूस्त करणार आहेत. अशी माहिती महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

महालक्ष्मी ट्रस्टने देवळे दुरूस्त करावेत

पुरग्रस्त भागातील देवळांचेही मोठे नुकसान झाले असून आमदार लांडगे हे ज्या पद्धतीने १०० तालमी दुरूस्त करणार आहेत. त्या पद्धतीने कोल्हापुरमधील महालक्ष्मी ट्रस्टने सर्व देवळे दुरूस्त, तर कोणी नदी घाट, गोबर गॅस दुरूस्त करण्याच्या घोषणा केल्या पाहिजेत.