“… मग काय त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं?”

0
323

मुंबई दि. २९ (पीसीबी) “अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू होणार आहे. करोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील उपाहारगृहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेत आहेत. उपाहारगृहांबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होताच पुढील आठवडय़ापासून किमान ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हॉटेल-उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनांना दिली. आता यावरून पुन्हा एकदा मनसेनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

 

मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं?,” असं म्हणत मनेसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

निर्बंध शिथिल करण्याचे संकेत

राज्य सरकारने ‘पुन्हा सुरुवात’ या मोहिमेंतर्गत गेल्या चार टप्प्यांत दुकाने, उद्योग, व्यवसाय, निवासी हॉटेल, दळणवळण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, व्यायामशाळा, नाटय़गृह, चित्रपटगृहे, तरण तलाव आणि उपाहारगृहे, बार आणि रेस्टॉरंट आदींवरील निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. सध्या उपाहारगृहांमधून घरपोच पदार्थ मिळतात. ऑक्टोबरपासून उपाहारगृहांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येऊ शकेल. त्यासाठी टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात १ ऑक्टोबरपासून आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. केंद्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच, राज्य सरकार आपली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा करताना उपाहारगृहे सुरू करण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले.

नियमांचे पालन आवश्यक

उपाहारगृहांमध्ये मुखपट्टीचा वापर, हात धुणे, अंतरनियम पाळणे या तिन्ही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असून, तेथील आचारी (शेफ), सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उपाहारगृहाची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून या सर्वाचा विचार करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे. त्यावर शिक्कामोर्तब होताच उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.