पीएमसी बँकेच्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
375

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर (PMC) निदर्शने करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजय गुलाटी असे या खातेदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय गुलाटी असे या खातेदाराचे नाव असून ते ५१ वर्षांचे होते. पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत त्यांचे खाते होते. बँकेवरील निर्बंधांमुळे त्यांचे ९० लाख रुपये अडकले होते. सोमवारी दुपारी खातेदारांनी तारापोर गार्डन परिसरातील बँकेच्या शाखेसमोर निदर्शने करण्याचे ठरवले होते. आपल्या पैशाचंही काहीतरी होईल, या आशेने गुलाटी देखील त्यात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली. अनेक लोक त्यांच्या कष्टाच्या पैशांसाठी आक्रोश करत होते. काही वेळ निदर्शन केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले.संजय गुलाटी सुद्धा साडेतीनच्या सुमारास घरी आले आणि झोपले. पावणे पाचच्या सुमारास त्यांनी पत्नीकडे काहीतरी खायला देण्यास सांगितले. ते खात असतानाच ते कोसळले. घाबरलेल्या त्यांच्या पत्नीने सोसायटीचे सचिव यतींद्र पाल यांना फोन केला. त्यांनी तातडीने धाव घेऊन संजय यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृच घोषित केले. संजय यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.