आळंदीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

0
298

आळंदी, दि. १६ (पीसीबी) – सज्जाचे प्लायवुड काढण्यासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेलेल्या एका बांधकाम कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना आळंदी डुडुळगाव येथील इस्कॉन इमारतीच्या साईटवर घडली.

मिन्टु झनटु पोराई (रा. बमनग्राम ता. बमनगोला जि. मालदा, पश्चिम बंगाल) असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुकांता भैरव सरकार (वय २१, रा. इस्कॉन सिटी बांधकाम लेबर कॅम्प, डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रणव गोपाल बैद्य (रा. पुर्णानगर, राजरमठ, श्रीनगर जि. नदीया पश्चिम बंगाल) या इसमाविरोधात कामगारांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची साधने न पुरवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मिन्टु पोराई हे डुडुळगाव येथील इस्कॉन इमारतीच्या साईटवर कामाला होते. रविवारी (दि.१६ जून) दुपारी दीडच्या सुमारास मिन्टु हे इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सज्जाचे प्लायवुड काढण्यासाठी गेले होते. यावेळी सुरक्षेच्या द्रुष्टीने त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवण्यात आली नव्हती. काम करत असताना त्यांचा तोल जावून ते खाली पडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन मिन्टु यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रणव यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.