मराठा आरक्षण: हर्षवर्धन जाधवांसह राष्ट्रवादीच्या चि‍कटगावकरांचाही अामदारकीचा राजीनामा

0
695

औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) –  राज्यातील तमाम मराठा बांधवांच्या मराठा आरक्षण मागणीची सहनशीलता संपल्याची जाणीव काकासाहेब शिंदे या तरुणाने आपल्या बलिदानाने करून दिल्याने मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी सायंकाळी केली. गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, ‘राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही,’ असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.