अमिताभ बच्चन यांनी फेडले बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज

0
529

पाटना, दि. १२ (पीसीबी) – बॉलिवूड शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून जास्त शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘माझे आश्वासन पूर्ण केले आहे. बिहारमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी होती, त्यांच्यातील २१०० जणांची निवड करण्यात आली आणि ओटीएसच्या (वन टाइम सेटलमेंट) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे’.

अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांपैकी काही जणांना जनक येथे बोलावले होते. तिथे मुलगी श्वेता आणि अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. जनक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे नाव आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, ‘कर्जाची रक्कम परत करण्यात असमर्थ असणाऱ्यांसाठी एक गिफ्ट आहे. ते बिहार राज्यातील असतील’.

अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांची मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील तीन हजाराहून जास्त शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. याशिवाय अमिताब बच्चन यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंब आणि पत्नींना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.