देशाला कणखर नेतृत्वाची गरज – नितीन गडकरी

0
475

अलिबाग, दि. २१ (पीसीबी) – चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्टाचार आणि विकासाचा दृष्टिकोन नसलेले देशाचे नेतृत्व यामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. पाच वर्षांत देशात १७ लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली. यात महाराष्ट्रातील ६ लाख कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अलिबाग येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.  महाआघाडी ही संधिसाधूंची आघाडी आहे. यांचे कडबोळ्याचे सरकार आले, तर देशाचा विकास होणार नाही, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देशातील आतंकवाद, नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी भक्कम कणखर नेतृत्व आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे. ते कोण देऊ शकते, याचा विचार करा आणि मगच मतदान करा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.