सरकारविरोधी घोषणा देत शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना

0
514

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला ‘उलगुलान मोर्चा’ मुंबईत दाखल झाला आहे. सरकारविरोधी घोषणा देत या शेतकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली आहे. आंदोलकांनी बुधवारी सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर आज पहाटे साडेचारच्या सुमारास शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत.

वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. “सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करु आणि गरज पडल्यास जेलभरो आंदोलनही करु,” असा इशारा या मोर्चाचं नेतृत्त्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावरुन उठणार नाही, अशी निर्धार त्यांनी केला आहे. आंदोलक सकाळी साडे अकरा वाजता आझाद मैदानात ठिय्या देतील. त्यानंतर प्रतिभा शिंदे काही सहकाऱ्यांसह दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडतील.