पिंपरी, दि. ८ गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेत आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी तसेच सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी विविध पदाधिकारीही उपस्थित होते.
बैठकीत शहरातील प्रत्येक पूरग्रस्त व पाणी साचणाऱ्या भागाचा सखोल आढावा घेतला. नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागू नये, यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर नव्हे, तर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
शहरात ज्या-ज्या ठिकाणी सातत्याने पाणी साचते, त्या सर्व ‘हॉटस्पॉट्स’चे तातडीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून, पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होईल अशा प्रभावी उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे सक्त आदेश दिले. केवळ कागदोपत्री नियोजन नको, तर प्रत्येक काम प्रत्यक्ष मैदानात दिसले पाहिजे, अशी स्पष्ट सूचना केली. यासोबतच, ज्या ठिकाणी विद्यमान पाइपलाइनची क्षमता अपुरी पडत आहे, त्या ठिकाणी भविष्यात ‘पाईप टू बॉक्स कल्व्हर्ट’ पद्धतीने नाल्यांची रचना करण्याचा प्रस्ताव तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होत असलेले शहरीकरण लक्षात घेता, पुढील ३० वर्षांचा विचार करून सांडपाणी व पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी आधुनिक आणि सक्षम ‘इन्फ्रास्ट्रक्चर मास्टरप्लान’ तयार करण्याचे निर्देशही मी दिले. तसेच नैसर्गिक जलप्रवाह सुरळीत राहावा यासाठी शहरातील जुन्या नाल्यांचे पुनरुज्जीवन, अडथळे दूर करणे आणि निचरा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
भविष्यात अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेसह सर्व संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने ग्राउंड लेव्हलवर उतरून समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश दिले. महावितरण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर अनुषंगिक विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी सूचनाही बैठकीत केली.
पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्येक पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देत, कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे प्रशासनाला बजावले. शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायमस्वरूपी समाधानासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

