पाण्याचे मार्ग खुले करा- भाऊसाहेब भोईर

bpcauthor
3 Min Read

पिंपरी-चिंचवड शहरात अल्पकालीन पाऊस झाला तरी अनेक प्रमुख रस्ते, चौक, महामार्ग तसेच निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. परिणामी वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, नागरिकांची गैरसोय तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. ही समस्या केवळ पावसाच्या प्रमाणामुळे निर्माण होत नसून शहरातील नैसर्गिक जलप्रवाह आणि पाणी मुरण्याच्या व्यवस्थेवर झालेल्या अतिक्रमणांचा हा परिणाम आहे.
पूर्वी शहर व उपनगरांमधील रस्त्यांच्या कडेला असलेले मातीचे चर, नैसर्गिक नाले, ओढे, पाण्याचे वाहते मार्ग आणि खुल्या जागा पावसाचे पाणी वाहून नेण्याचे तसेच जमिनीत मुरविण्याचे महत्त्वाचे माध्यम होते. मात्र वाढते शहरीकरण, काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिवापर, रस्त्यालगतची अनियंत्रित बांधकामे आणि नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमणे यामुळे ही संपूर्ण व्यवस्था कोलमडत चालली आहे.
आज शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी माती शिल्लक राहिलेली नाही. रस्ते, पदपथ, सोसायट्यांचे आवार, सार्वजनिक मोकळ्या जागा आणि अगदी झाडांच्या बुंध्याभोवती देखील काँक्रीट व पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आहेत. परिणामी पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या जमिनीत न मुरता थेट रस्त्यावर साचते आणि जलनिस्सारण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.
तसेच शहरातील अनेक नैसर्गिक नाले, ओढे, तलाव, तळी व जलमार्ग यांचे मूळ स्वरूप बदलले गेले आहे. काही ठिकाणी त्यांची रुंदी कमी झाली असून काही ठिकाणी त्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. भविष्यातील शाश्वत विकासाच्या दृष्टीने या सर्व नैसर्गिक जलस्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिकेने शहरातील सर्व नैसर्गिक जलप्रवाह, नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याचे मार्ग यांचे वैज्ञानिक मॅपिंग करून त्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा. तसेच नवीन विकासकामे, रस्ते, गृहप्रकल्प व सार्वजनिक प्रकल्पांना मंजुरी देताना पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहील याची सक्तीने अंमलबजावणी करावी.
याशिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आवश्यक असलेल्या खुल्या मातीच्या जागा, रेन वॉटर रिचार्ज झोन, जैविक जलनिस्सारण व्यवस्था (Bio-swales) आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.
शहराचा विकास हा केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि उंच इमारती उभारण्यात नसून पर्यावरणीय संतुलन, जलव्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यामध्येही आहे. अन्यथा भविष्यात पाणी तुंबणे, शहरी पूर, भूजल पातळीतील घट आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या गंभीर समस्यांना शहराला सामोरे जावे लागेल.
म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक जलप्रवाह अबाधित राखणे, पाणी मुरण्याची क्षमता वाढविणे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज असून प्रशासनाने याबाबत तातडीने व्यापक व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Share This Article