मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर

bpcauthor
2 Min Read

४२०० नागरिकांना सुरक्षित स्थलांतर, मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी

*पिंपरी, दि.६ शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर (फील्डवर) कार्यरत आहेत. शहरात आतापर्यंत ३२६ मिमी पावसाची नोंद झाली असून, काही सखल भागांतील रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सुमारे ४२०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या १७ ते १८ ठिकाणी तात्काळ बोटी तैनात केल्या आहेत.

पूरबाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मदत केंद्रांना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

प्रशासनाने नागरिकांच्या निवासासाठी शहरात चोख व्यवस्था केली असून, पिंपरी नगर येथील कमला नेहरू शाळा येथे सर्वात मोठे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये मिलिंदनगर, विजयनगर आणि संजय गांधी नगर भागातील २५० कुटुंबे म्हणजेच १,०८० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितपणे आश्रय देण्यात आला आहे.

येथे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जनरेटरद्वारे अखंडित प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, जेवणाची उत्तम व्यवस्था आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध करून दिली आहेत.

यासोबतच फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळा मदत केंद्रातही १८५ नागरिकांची अशीच उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, तिथल्या अधिकाऱ्यांना नागरिकांची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने उद्यासाठी शहरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, “नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ स्थलांतरित व्हावे, नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि कोणतीही मदत हवी असल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधावा,”असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article