दि.०७ (पीसीबी)-राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जाचा त्याग करुन हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केल्यानंतर सध्या जैन समुदायात वाद पेटला आहे. लोढांच्या या वक्तव्यावरुन जैन समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान अज्ञानमूलक आहे किंवा ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे, अशी टीका जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वत:चे तीर्थंकर, स्वत:ची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत. परंतु, जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे, असे ललित गांधी यांनी म्हटले.
अल्पसंख्याक दर्जा हा एकप्रकारे आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्त्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करु. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही, हे लोढा यांनी समजून घ्यावे, अशा इशाराही ललित गांधी यांनी दिला.
जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या ‘फूट डालो आणि राज करो’ या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे. एकेकाळी दक्षिण भारतात 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ 3 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लीम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले. मात्र, हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करुन कमकुवत केले.
हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरु आहे. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवता येईल. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा ‘आम्ही हिंदू’ ही भावना प्रबळ करण्याची गरज आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले होते.








































