आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर या तालुक्यात बिबट्यांच्या मानवी वस्तीत वावर वाढला असून आजवर अनेक ग्रामस्थांचा विशेषतः लहान मुलांचा बळी गेल्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून खासदार डॉ. कोल्हे यांनी बिबट हा प्राणी शेड्युल १ मधून वगळून त्याचा समावेश शेड्युल २ मध्ये करावा या मागणीचे निवेदन दिले. त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी हा महत्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प उभारण्याची घोषणा तत्कालिन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विधानसभेत केली होती. मात्र त्यानंतर ४ वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप हा प्रकल्प प्रलंबित असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांच्याकडे इंद्रायणी मेडिसिटीला चालना देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. या दोन्ही महत्त्वाच्या विषय पंतप्रधानांनी समजून घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात आदिवासी बहुल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती असून या वनस्पतींचे जतन व्हावे आणि त्यावर संशोधन व्हावे यासाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र जुन्नर येथे व्हावे यासाठी तत्कालिन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप काहीच कार्यवाही होत नसल्याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले. त्यांनी हा विषय आस्थेने समजून घेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
खासदार डॉ. कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्यासाठी आपण गेल्या ६-७ वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे सांगून ही शिवसंस्कार सृष्टी’ उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यातून स्थानिक तरुणांना विविध माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर परदेशी पर्यटकांना व देशातील नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख होईल असे सांगत या विषयात गांभीर्यपूर्वक लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचबरोबर तळेगाव, चाकण, रांजणगावसह विविध एमआयडीसीतील उद्योगांना वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. या उद्योगांना मालवाहतुकीसाठी स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत थेट न्हावाशेवा बंदराला जोडण्यासाठी उरण, तळेगाव, चाकण, संभाजीनगर असा नवीन रेल्वे (Dadicated freight corridor) उभारण्यात यावा अशी मागणीही केली.
पंतप्रधान मोदी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच प्रकल्पांबाबतची माहिती आस्थेने समजून घेतली आणि या सर्व विषयात जातीने लक्ष घालण्याचे तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अण्णा भाऊ साठे आणि तुकडोजी महाराज यांना भारतरत्न जाहीर करण्याबाबतही लक्ष घालण्याचे आश्वासन खासदार डॉ. कोल्हे यांना दिले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विषय आस्थेने समजून घेतल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

