सांगली-आटपाडी येथे लग्नाच्या पाचव्या दिवशीच दागिने, पैसे घेऊन नववधू पोबारा

0
6

सांगली, दि.५ : वय चाळीशीजवळ पोहचलेले. तरीही जीवनसाथी मिळत नाही यामुळे त्रस्त झालेल्या युवकांने एका मध्यस्थीच्या मदतीने उपवधू शोधली. मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने देवळात विवाह विधीही पार पडला. नववधूने घराच्या उंबरठ्याचे माप ओलांडले. मात्र, लग्नाच्या पाचव्या दिवशीच्या रात्री नववधूंने एक लाख ४१ हजाराचे दागिने, मोबाईल, आणि २१ हजाराची रोकड घेउन पोबारा केला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच, नववधूसह लग्न जमविणार्‍या मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, आटपाडीतील ३८ वर्षाचा शेतकरी तरूण. शेती करत असल्याने लग्नासाठी वधूही मिळेना झाली होती. उपवर वधू गेली दहा वर्षे वधू संशोधन करत होता. मात्र, वधू मिळत नसल्याने अखेर एका मध्यस्थीला गळ घालून वधू संशोधन केले. मुलगी पाहण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ मुलीची सहमती आवश्यक होती. मुलीची सहमती असल्याचे मध्यस्थाने सांगितले. पै-पाहुणे बोलावून वाजत-गाजत लग्न करण्याचे ठरविले तर आणखी काही तरी विघ्न येण्याची भीती होती. यामुळे दि. २० मार्च रोजी एका देवळात मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने विवाहविधी पार पडला.

नववधूसह नवर्‍याने घराचा उंबरठा ओलांडला. चार दिवस मुलगी घरात राहिली. मात्र पाचच्या दिवशी दि.२५ मार्च रोजी नववधूंने अंगावरील सोन्याचे दागिने, कपडे, मोबाईल असा १ लाख ४१ हजार ४१५ रूपयांचा ऐवज आणि घरातील घरखर्चासाठी ठेवलेली २१ हजाराची रोकड घेउन मध्यरात्री ३ वाजणेच्या सुमारास घरातून पोबारा केला.

गेले आठ-दहा दिवस नववधूचा व संबंधित मध्यस्थाचा ठावठिकाणा शोधण्यात युवकाचे प्रयत्न चालू होते. अखेर शुक्रवारी आटपाडी पोलीस ठाण्यात नववधूसह मध्यस्थाविरूध्द फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार मुलीसह मध्यस्थाला पोलीसांनी अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने दि. ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.