पिंपरी, दि. ४ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी आर्थिक स्वरुपात आगाऊ रक्कम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी १५ हजार रुपये सण अग्रिम दिला जाणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात आगाऊ रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये अग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सणासाठी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा हा निर्णय महत्त्वाचा समजला जातो.
सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी किंवा सातव्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी असणाऱ्या पात्र सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरुपात या सण अग्रिमचा लाभ मिळणार आहे. सण अग्रिम म्हणून दिली जाणारी १५ हजार रुपयांची रक्कम सदर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांप्रमाणे १० हप्त्यांमध्ये परतफेड केली जाणार आहे. ही सण अग्रिमाची रक्कम १४ एप्रिल २०२६ पूर्वी अदा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिका उत्साहात साजरी करीत असते. शिवाय जयंतीचे औचित्य साधून भव्य स्वरुपात पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे देखील आयोजन महापालिका दरवर्षी करीत असते. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता या जयंती सणासाठी एकरक्कमी सण अग्रिम देऊन या जयंती उत्सव सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि प्रगतीचा दिलेला संदेश आजही आपल्या कामकाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सण अग्रिम देण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचाही एक प्रयत्न आहे. , असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.










































