दि.०२(पीसीबी)- २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील पत्रकार परिषदेत काही “असामान्य मतदान पॅटर्न” समोर आणण्यात आले असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेवर चर्चा रंगली आहे.अर्थतज्ज्ञ परकाला प्रभाकर यांनी दावा केला आहे की, सुमारे ४.१६ टक्के मते ही रात्री ११:४५ नंतर ते पहाटे २ वाजेपर्यंत नोंदवली गेली. म्हणजेच जवळपास १७ लाख मते मध्यरात्रीनंतर टाकण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ही मते एनडीएच्या बाजूने गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, काही ठिकाणी केवळ ६ सेकंदांच्या अंतरात मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले असून, सुमारे ३,५०० मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनीही या प्रकरणी गंभीर चिंता व्यक्त करत निवडणूक नोंदींचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. विशेषतः Form 17C आणि Form 20 या महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला.
कुरेशी यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर Form 17C हे मतदान केंद्रावर सीलबंद आणि स्वाक्षरीत असते, तर नंतर एकत्रित आकडेवारीत तफावत का दिसते?”
तसेच, मतदानाच्या टक्केवारीची माहिती त्याच दिवशी जाहीर करावी आणि बूथनिहाय माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, या आरोपांवर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.








































