जातीभेद विसरण्याचे आवाहन, रावेत येथील हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दि.२१(पीसीबी)-भारताचा इतिहास जगात सर्वश्रेष्ठ असून, एकसंध हिंदू समाज आणि अखंड हिंदूराष्ट्रासाठी जातीभेद विसरून प्रत्येकाने आपल्या मनात सर्व हिंदू समभाव जागृत करावा, असे आवाहन धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी गुरुवारी येथे केले. सकल हिंदू संमेलन संयोजन समितीच्या वतीने डी मार्ट शेजारील मैदानात आयोजित केलेल्या विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. इस्कॉनच्या श्री गोविंद राधा मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग प्रभुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जनजाती कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र छात्रावास विभाग प्रमुख दिनकरराव देशपांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष सौ. तृप्ती राठोड व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. मिलिंद ढोबळे आणि सौ. सपना स्वानंद राजे यांनी सूत्रसंचालन केले.
हिंदू नववर्षाच्या पहिल्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत स्फूर्तिदायी वातावरणात झालेल्या या हिंदू संमेलनास श्रीकृष्ण मंदिर परिसरातील हिंदू बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त जागरण पत्रिकेने प्रकाशित केलेल्या संघयात्र या विशेषांकाचे उपस्थित पाहुणे तसेच हिंजवडी गटाचे सहकार्यवाह यज्ञेश डांगे आणि प्रचारक शेखर पंडित यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनापूर्वी आठवडे बाजार येथे श्री गणेश आणि श्रीरामाची आरती करण्यात येऊन सर्वजण मिरवणुकीने संमेलन स्थळी आले. केरळी बांधवांचा चेंडा मेलम वाद्यपथक तसेच ढोल पथकाचा निनाद आणि श्रीरामाच्या जयघोषाने मिरवणुकीची रंगत वाढवली. संमेलन स्थळी मंडलेल्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्व्लनाने या प्रदर्शनाचे आणि हिंदू संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. मान्यवांच्या हस्ते गो-पूजनही करण्यात आले. विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, सहकार भारतीचे डॉ मुकुंदराव तापकीर , नगरसेवक निलेश गुलाबराव तरस , श्री धर्मपाल तंतरपाळे , सौ ऐश्वर्या राजेंद्र तरस , सौ रेश्माताई बापू कातळे , श्री मोरेश्वर भोंडवे , श्री दीपक मधुकर भोंडवे , रावेत पोलीस स्टेशनचे प्रमुख नितीन फटांगरे यांनी संमेलनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात परिसरातील विविध सोसायटीममधील श्री गणेश वंदना , श्री शिवाजी महाराज मानवंदना , श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचना प्रस्तुत करण्यात आल्या . सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन श्री महेंद्र वायकोळे , सौ अश्विनी पाटील , सौ सुचिता शिंदे , श्री प्रभू झुंजा , श्री मनीष अय्यर यांनी पाहिले.
उपस्थित हिंदू बांधवांशी संवाद साधताना श्री. एकबोटे म्हणाले, ” छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र भगवा केला. हर हर महादेवचा प्रतिध्वनी आसामच्या जंगलांत तसेच देशभरात घुमला. हिंदू धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिले. परमेश्वराशी एकरूप होऊन हिंदू धर्म ध्वज फडकत ठेवणारे शेकडो साधू-संत महाराष्ट्राला लाभले. अध्यात्माचा श्रेष्ठ मार्ग हिंदू धर्माने सांगितला. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिकारक भगतसिंग, स्वामी विवेकानंद यांच्या सारख्या महापुरुषांनी हिंदुत्व टिकवले. असे महापुरुष- वीरांची अखंड मालिका असतानाही आज हिंदू ऐक्य करण्यात काही उणीवा जाणवत आहेत. ”
” आजच्या दिवशी जन्मलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माते डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून हिंदू समाजाला जीवनाचा मंत्र दिला. डॉ. हेडगेवार यांनी हिंदू धर्माच्या उत्थानाचे कार्य केले. त्यांनी दिलेला हिंदू संघटनाचा मंत्र ज्यांनी आचरणात आणला त्यांच्या जीवनाचे सोने झाले. आयुष्यभर त्यांनी हिंदू राष्ट्र आणि भारत मातेचा विचार केला. संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, असे ते म्हणत. त्यांनी दिलेल्या संपर्काचे अमृत समस्त हिंदू समाजाला पाजले पाहिजे, ” असे एकबोटे यांनी सांगितले.
श्री. जगदीश गौरांग प्रभुजी म्हणाले, ” हिंदू धर्मासाठी अनेक शूरवीरांनी बलिदान दिले. आपली वैचारिक पातळी इतकी ढासळलेली आहे की आपण स्वत:ला विसरलो आहोत. हिंदू संमेलनाला लोकांना बोलवावे लागते. परदेशी लोक आपला सनातन धर्म पाळतात आणि आपण पाळत नाही, ही शोकांतिका आहे. प्रत्येकाच्या हृदयात भगवत गीता रूजवण्याची गरज आहे. आपल्या धर्म ध्वजाचा सन्मान कमी होणार नाही, यासाठी प्रत्येकाने सनातन संस्कृती जपण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. ”
श्री. दिनकर देशपांडे यांनी उपस्थितांना पंच परिवर्तनाची माहिती दिली. या हिंदू संमेलनालाठी श्री अमोल संपतराव शिंदे, श्री भरत घोलप, जितेंद्र प्रजापती, श्री अमोल चौधरी, श्री सचिन पाटील , श्री केदार तळेगावकर, श्री हितेश शेठ, श्री केदार कुलकर्णी, श्री हर्षल भारंबे, श्री लिनेश राणे, श्री सचिन फापाळे,श्री महांनतेश नाईक,चंद्रकांत सावंत, श्री दीपक नेमाडे यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
सुरुची प्रसादानंतर सौ सोनाली साठे आणि रॉयल कासा सोसायटीच्या पथकाने सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातम् ने संमेलनाची सांगता झाली.









































