स्व. शंकर (आण्णा) गावडे यांचा २२ वा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ९
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शंकर (आण्णा) गावडे यांचा २२ वा स्मृतिदिन आज पिंपरी येथे भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी स्व. शंकर (आण्णा) गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजूर्डे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, सभासद, महानगरपालिका कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. शंकर (आण्णा) गावडे यांनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तसेच कर्मचारी हिताच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि कर्मचारी महासंघाला सक्षम व बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

त्यांचे नेतृत्व, कामगारांप्रती असलेली तळमळ आणि कर्मचारी हितासाठी केलेला संघर्ष आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “आण्णांचे विचार, संघर्ष आणि कर्मचारी हितासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा कर्मचारी चळवळीला सदैव मार्गदर्शक ठरेल,” अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share This Article