घरगुती गॅसचा पुरेसा साठा, पॅनिक होऊ नका- जिल्हाधिकारी पुणे

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि.१२(पीसीबी)-पुणे शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून वितरणही सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे. घरगुती गॅसच्या नोंदणीसाठी (बुकिंग) आता ३० दिवसांचा कालावधी लागत आहे. तरी एका व्यक्तीने दोन सिलिंडरची नोंदणी केली असल्याने दुसरा सिलिंडर त्वरित मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता असून, त्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागेल. परिणामी, नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी अथवा काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांविरोधात थेट गुन्हे दाखल करा,’ असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचे लोण पुण्यापर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक; तसेच हॉटेल व्यावसायिकांना गॅसपुरवठा करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे हॉटेल, खाणावळ, रेस्टॉरंट; तसेच छोटे- मोठे हातगाडे विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गॅस, इंधनाचे दर वाढण्याची; तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

Share This Article