एक स्पष्ट वक्ता …परखड मत मांडणारा दादा आपल्यात नाही हे मान्यच होत नाही;श्रध्दांजली वाहताना अनेकांचे शब्दच निशब्द झाले…
दादा, तुम्ही वेळ पाळत होतात मग आता अवेळी कसे गेलात…
मुंबई दि.२४ – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यावतीने वरळी डोम येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
अचानकच अजितदादांना श्रद्धांजली द्यायची वेळ येईल असे वाटले नव्हते पण आज ती वेळ आपल्यावर आलीय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकभावना व्यक्त केली.
राज्य घडते ते एक व्यक्ती घडवत नसते तर अनेकांचे योगदान त्यामध्ये असते. एखादे नेतृत्व आपले योगदान त्यामध्ये देत असते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आदराने नाव घेतले जाईल ते अजितदादांचे असेल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
अजितदादा हे महाराष्ट्राचा लोकनेता होता. संपूर्ण राज्यात कुठल्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा कोण नेता आहे आणि प्रत्येक जिल्हयाची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असायची. महाराष्ट्राची नस ओळखणारा नेता म्हणजे अजितदादा होते असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दीर्घकाळ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केले असल्याने राज्याला एक आर्थिक शिस्त दादांनी अर्थसंकल्पातून घालून दिली होती. लोकाभिमुख निर्णय दादा घ्यायचे. पण आर्थिक भार कसा वाढणार आहे हेही निर्णय घेताना हक्काने सांगायचे आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास करून अजितदादा मंत्रीमंडळाच्या बैठकीत यायचे आणि आपलं मत व्यक्त करायचे. एक प्रशासक म्हणून त्यांची ओळख आणि प्रशासनात एक वेगळीच जरब होती असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सहकार, क्रीडा क्षेत्रात त्यांनी नेमकेपणाने व शिस्तबद्ध पद्धतीने काम केले.ज्या – ज्या गोष्टी हातात घेतल्या त्या टापटीपपणे चालवायच्या शिवाय वैयक्तिक संबंध ठेवण्यात त्यांची हातोटी होती. त्यामुळेच अजितदादांनी प्रचंड मोठा गोतावळा तयार केला होता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्रध्दांजली वाहण्याची अशी वेळ इतक्या लवकर येईल असं स्वप्नातही वाटलं नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एक स्पष्ट वक्ता… परखड मत मांडणारा दादा… राज्याच्या विकासाचा ध्यास असलेला नेता आज सर्वांच्या मनाला चटका लावून गेला. तिघेही एकमेकांच्या मनातील ओळखत होतो पण काळाच्या पुढे जाऊन दादांना ओळखता आले नाही अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आपल्या घरातील कुणीतरी गेलंय याचा अनुभव राज्यातील जनता आज घेत आहेत. आपला माणूस… कामाचा, विश्वासाचा माणूस म्हणून दादांची ओळख होती. कामात कधी तडजोड केली नाही. एक अनुभवी नेता आपल्यातून गेलाय याबाबत अतीव दु:ख होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
दादा तुम्ही दिलेला शब्द पाळला. दादा तुम्ही खूप मोठे काम महाराष्ट्रासाठी उभे केले आहात. दादा तुम्ही वेळ पाळत होतात मग आता अवेळी कसे गेलात अशा धीरगंभीर आवाजात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दादांना सवाल केला. यावेळी त्यांचा कंठ दाटून आल्याचे पहायला मिळाले. ज्या वटवृक्षाच्या छायेत आपण वाढतो पण तोच वटवृक्ष उन्मळून पडतो त्यावेळी त्याचे महत्त्व कळते असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है… उम्र भर का गम हमे इनाम दिया है… या गाण्याच्या ओळीतून शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी दादा आणि त्यांच्या मैत्रीबद्दल आपली भावना शोकसभेत व्यक्त केली.
जवळपास ३८ वर्ष एकत्र असल्याचे सांगतानाच विधानसभेच्या वर्गात एकमेकांच्या शेजारी बसत दादांचे अनेक पैलू पाहिले. खुल्या मनाचा… दिलदार मनाचा… विनोद करायचा असेल तर ठाम मताने करणारा दादा होता असेही जयंत पाटील म्हणाले.
अजितदादांचे महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न होते. संघटना वाढवावी व ताकदीने काम करत रहावे असे प्रचंड महत्त्वाकांक्षी दादा होते. मात्र अपघाताने त्यांच्या महत्वाकांक्षेची राखरांगोळी झाली अशी भावना जयंत पाटील यांनी मांडली.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ज्या काही भेटी महाराष्ट्रात आल्यावर दादांसोबत झाल्या त्याबद्दल सांगतानाच दादांनी राज्यातील जनतेच्या मनात ‘कामाचा माणूस’ ही ओळख निर्माण केली. शरीर जरी जळाले तरी आत्मा हा कामातून आपल्या स्मरणात कायम रहात असतो असे आपल्या हिंदी मनोगतातून सांगितले आणि दादांना
श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, अभिनेते नाना पाटेकर, रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शोकसभेला उपस्थित राहिलेल्या लोकांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी दादांच्या आठवणी एका चित्रफितीतून दाखवण्यात आल्या. शिवाय दादांच्या अंत्ययात्रेचीही चित्रफित दाखवण्यात आली. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी पसायदान म्हणून शोकसभेची सांगता झाली.
या शोकसभेला पवार फॅमिली आणि मोठमोठे उद्योगपती, सर्व पक्षाचे नेते, मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, सनदी अधिकारी, संपादक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































