रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात; खासगी विमानातील सात जणांचा मृत्यू

0
3

नवी दिल्ली, दि. २४ : झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात चालक दलातील दोन सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात कोसळलं. या अपघातानंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

या घटनेबाबत Directorate General of Civil Aviation (DGCA) ने
अधिकृत निवेदन जारी केले आहे. 23 फेब्रुवारी रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट C90 विमान रांची–दिल्ली मार्गावर एअर अँब्युलन्स उड्डाण करत होते.

DGCA चे अधिकृत निवेदन (DGCA Official Statement)
DGCA च्या माहितीनुसार, विमानाने सायंकाळी 7:11 वाजता रांचीहून उड्डाण केले. कोलकाता एटीसीशी संपर्क प्रस्थापित केल्यानंतर सायंकाळी 7:34 वाजता दक्षिण-पूर्व वाराणसी परिसरात रडार आणि रेडिओ संपर्क तुटला. त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून AAIB कडून सखोल चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासियातू करमटांड जंगलात संशयित धातूचा मलबा आढळून आला आहे. प्राथमिक चर्चेनुसार, ते एअर अँब्युलन्सचा अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलब्यात प्रोपेलर आणि इंजिनचे भाग दिसून आले आहेत.

ATC संपर्क तुटल्यानंतर RCC सक्रिय
वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोल (VEBN) च्या माहितीनुसार, VT-AJV हे विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर संपर्कात आले नाही. पायलटची शेवटची बातचीत कोलकाता क्षेत्रातील ATC UKW VECC (VHF 132.25 MHz) शी झाली होती. संपर्क तुटल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने, रात्री 8:05 वाजता रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (RCC) सक्रिय करण्यात आले आणि शोध-बचाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.