भोसरीतील वीजपुरवठा सुरळीत

0
3

भोसरी, २४ : महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात होणाऱ्या सततच्या बिघाडामुळे भोसरी-पिंपरी परिसरातील वीज ग्राहक विस्कळीत वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त होते.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरावड्यात भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये दोनदा बिघाड झाला. त्यातील रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री अकराच्या सुमारास झालेला बिघाड मोठ्या स्वरुपाचा असल्याने उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याचा महापारेषण कंपनीने घेतला. सोमवारपासून सुरु असलेले रोहित्र बदलण्याचे काम अखेर रविवारी (२२ फेब्रुुवारी) पूर्ण झाले.

महावितरणच्या भोसरी उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक ग्राहकांचा समावेश होते. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरात पाच हजारांहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. तसेच सुमारे ३५ हजार ग्राहक या परिसरात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये वारंवार बिघाड हात होते.
दोन फेब्रुवारीला भोसरीतील अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अंतर्गत बिघाड झाला होता. त्यानंतर १३ दिवसांनीच रविवारी रात्री ११ वाजता उपकेंद्रातील राेहित्रामध्ये पुन्हा बिघाड झाल्याने भोसरी व पिंपरी विभागातील एस ब्लॉक, जे ब्लॉक, डी दोन ब्लॉक, एफ दोन ब्लॉक, टी ब्लॉक, इंद्रायणीनगर, भोसरीगाव, जलवायू विहार, गंधर्व नगरी, सेक्टर चार, सहा, नेहरूनगर, संत तुकाराम नगर, दापोडी, कासारवाडी येथील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील पाचशेहून अधिक कारखाने बंद ठेवण्याची वेळ उद्याेजकांवर आली होती.

सातत्याने विस्कळीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे दैनंदिन कामे करणे अवघड झाल्याची प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. तर, वीज पुरवठा खंडीत झाला की, उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. बाजारपेठेतील स्पर्धेत उत्पादन मागे पडते. कामकाज ठप्प होत असल्याची भावना परिसरातील लघू उद्योजकांनी व्यक्त केली.

दरम्यान, महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. दिवसभरात इतर वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले. परंतु, अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठ्यात काही काळ व्यत्यय येत होता. या काळात वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते.
तसेच अशा प्रकारचे बिघाड टाळण्यासाठी उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याचे काम सोमवारपासून (१६ फेब्रुवारी) सुरू करण्यात आले होते. अखेर रविवारी (२२ फेब्रुवारी) हे रोहित्र बदलण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. त्यामुळे परिसरातील वीजग्राहकांनी सुटका झाल्याची भावना व्यक्त केली.