स्मारकासाठी बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून ११ गुंठे जागा
दि.०९(पीसीबी) – “पारतंत्र्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ चालवून कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी,जेवणासाठी दुपारची सुट्टी,किमान वेतन,कामाचा मर्यादित कालावधी आदी सुविधा मिळवून दिल्या.त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे हे खऱ्या अर्थाने कामगारांचे प्रणेते आणि युगप्रवर्तक म्हणून गणले जातात.” असे मत गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी कनेरसर येथे मांडले.
रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कनेरसर ग्रामपंचायतच्या रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, ग्रामपंचायत कनेरसर आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कनेरसर येथे आयोजित कार्यक्रमात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.
डॉ.भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त कार्यक्रमात नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज बाळासाहेब शांताराम लोखंडे यांनी रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे स्मारकासाठी स्वतःच्या मालकीची ११ गुंठे जागा देण्याचे जाहीर केले. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता त्यांनी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल सर्वांनी प्रशंसोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना गुणवंत कामगार मंडळाचे कोषाध्यक्ष महमदशरीफ मुलाणी यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यावेळी तानाजी एकोंडे, राजेश हजारे, बाळासाहेब साळुंके, प्रा. शिवाजी ताम्हाणे, चांगदेव झोडगे, लक्ष्मण ताम्हाणे यांनी ना.मे.लोखंडे यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.त्याप्रसंगी विधीज्ञ अंतरा देशपांडे, म. का. क. मंडळ चाकणचे केंद्रप्रमुख अविनाश राऊत, अमित खरपुडे, दिलीप माशेरे, काळूराम लांडगे, नंदकुमार धुमाळ, शंकर नाणेकर, संदीप रांगोळे, उमेश फाळके, पांडुरंग सुतार, रघुनाथ फेगडे, संदीप पानसरे आणि कनेरसरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी बाळासाहेब शांताराम लोखंडे यांनी स्मारकासाठी जाहीर केलेल्या जागेची पाहणी केली आणि नियोजनपूर्वक वैशिष्ट्यपूर्ण अशा भव्य स्मारकाची उभारणी करण्यात येईल. असा निर्धार करण्यात आला. त्या अनुषंगाने स्मारकासाठी देणगीचा ओघही सुरू झाला. ही सकारात्मक बाब असल्याचे मत डॉ. भारती चव्हाण यांनी मांडले.महेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.विधीज्ञ सुहास दौंडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.










































