पिंपरी, दि. २ – निगडी प्राधिकरण सेक्टर २४ मधील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी तसेच पवना जल दिंडी प्रतिष्ठानचे प्रवर्तक राजीव गोपाळ भावसार (वय ६४) यांचे रविवारी (ता. १) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.
गेल्या आठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी नीता, एक मुलगा, मुलगी, एक नातू व नात असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध ४० स्वयंसेवी संस्था, संघटना एकत्र याव्यात यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. तब्बल एक तप जलदिंडी उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ते सतत कार्यरत होते.
चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्कमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये पवना नदी दालन त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले. यामध्ये भीमा नदी खोऱ्यांतील नद्या व धरणांची माहितीही देण्यात आली आहे. पर्यावरण, नदी स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण जनजागृती मोहिमेत त्यांचे मोठे योगदान आहे. आरोग्य मित्र, युनायटेड भावसार समाज संघटनेत ते सक्रिय होते. विलो मेथड अँड फ्लॅट कंपनीतून व्यवस्थापक पदावरून ते चार वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झाले होते.











































