भाजपमध्ये या अन्यथा तुरुंगात जा…

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि 2एप्रिल (पीसीबी )- कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस जिल्हा न्यायालयाने सोमवारी (१ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप केले. आतिशी म्हणाल्या की, भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी माझ्या संपर्क साधण्यात आला. मी पक्षात आले नाही तर एका महिन्याच्या आत मला ईडीकडून अटक करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. माझ्या सहकाऱ्याशी संपर्क साधून हा प्रस्ताव देण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे ‘आप’ला नष्ट करू इच्छितात, असेही त्या व्यक्तीने सांगितले असल्याचा आरोप आतिशी यांनी केला.
आम्ही भाजपाच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू. ‘आप’च्या आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र भाजपाकडून आखण्यात येत आहे, असाही आरोप आतिशी यांनी केला. याआधी सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आधीच तुरुंगात धाडलेले आहे. आणखी चार नेत्यांना तुरुंगात पाठविण्याचे षडयंत्र भाजपाकडून रचले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
आतिशी यांनी पुढे जाऊन या चार नेत्यांचीही नावे सांगितली. “माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना अटक केले जाऊ शकते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्ष कोलमडून पडेल, असे त्यांना वाटत होते. पण इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडल्यानंतर आणि देशभरातून विरोधकांचा पाठिंबा ‘आप’ला मिळाल्यानंतर भाजपाला भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र आखले जात आहे”, अशी टीका आतिशी यांनी केली.

Share This Article