माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलीदहा लाख रुपयांची खंडणी

PCB Admin
2 Min Read

पुणे, दि.७ (पीसीबी): एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्याच्या साथीदारासह धायरी येथील ईशा इंटरनॅशनल प्री स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाच्या बांधकामाबाबत माहिती अधिकाराखाली अर्ज करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जुलै २०२३ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान धायरी या ठिकाणी घडला.

अक्षय रंगनाथ सावंत (वय २९, रा. धायरेश्वर विला, धायरी), प्रदीप अंकुश दोडके (वय ३५, रा. दांगट पाटील नगर, वडगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.त या प्रकरणी शिवाजी वसंत मते (वय ४७, रा. शिवालय अपार्टमेंट, धायरी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. मते यांची ईशा इंटरनॅशनल प्री स्कूल व गुरुकुल विद्यालय आहे. तर आरोपी सावंत आणि दोडके हे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात. या दोघांनी पुणे महानगरपालिकेकडे तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षकांकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दाखल केला होता. या अर्जाद्वारे त्यांनी ईशा इंटरनॅशनल प्री स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाच्या बांधकामाची माहिती मागवली होती. हा अर्ज मागे घेण्यासाठी आरोपींनी मते यांच्याकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीयंती तीन लाख रुपयांची मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात मते यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यावेळी सावंत यांनी ‘तुला लय मस्ती आली आहे. तू माझ्याविरुद्ध खंडणी पथकाकडे तक्रार करतोस काय? तक्रार मागे घे. नाहीतर तुझे हातपाय तोडून तुझा गेम करीन’ अशी देखील धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Share This Article