मुंबई, दि. १७ (पीसीबी) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होत. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध कऱण्याचे आवाहान केले होते. आयत्यावेळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रक काढून भाजपाने उमेदवार देऊ नये, असे म्हटले होते. दरम्यान, अर्ज दाखल कऱण्यापूर्वीच याचा विचार केला असता तर अधिक उचित झाले असते, पण नंतर पराभव समोर दिसल्याने सन्मानपूर्वक माघार घेण्याची खेळी भाजपने केल्याची टीप्पणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, अनेक राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे. बावनकुळे नागपूरमध्ये बोलत होते. आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.