विंबल्डनच्या पारितोषिक रकमेत कपात

0
378

लंडन, दि.१७ (पीसीबी) : टेनिस स्पर्धांच्या ग्रॅंड स्लॅम मोसमातील प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत ५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षीच्या तिकिट विक्रीला देखिल सुरवात करण्यात आली.

कोविड १९च्या संकटकाळात गेल्यावर्षी विंबल्डन ही एकमेव स्पर्धा होती की जी रद्द करण्यात आली. या वेळी ही स्पर्धा नेहमीसारखी २८ जून पासून सुरू होत आहे.

या वेळी एकूण परिस्थितीचा विचार लक्षात घेता पारितोषिक रकमेत ५.२ टक्के कपात करण्यात आली आहे. यावेळी ४९.४ दशलक्ष डॉलर म्हणजे अंदाजे ३ अब्ज रुपयाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये विजेता खेळाडू अंदाजे १७ कोटी रुपयाचा धनी होईल. यापूर्वी २०१९ मध्ये विजेता खेळाडू २४ कोटी रुपयाचा धनी झाला होता. आतापर्यंत खेळाडूंचा विचार केला जात होता. गेल्यावर्षीपासूनचा संकटकाळ बघता पारितोषिकाची रक्कम पहिल्या फेरीपासून सहाय्यक खेळाडूंना देखिल कशी वाटता येईल याचा विचार आम्ही केला असल्याचे ऑल इंग्लंड क्लबने स्पष्ट केले. यापूर्वी २०१९ मध्ये एकेरी मध्ये उपांत्य फेरीपासून पारितोषिके देण्यात आली होती. या वेळी पात्रता पेरीपासून पारितोषिके देण्यात येणार आहेत. व्हिलेचअर आणि क्वाड व्हिलचेअर प्रकारातील पारितोषिकेही वाढविण्यात आली आहेत.

या वेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीला मर्यादा असतील. पण, पुरुष आणि महिला एकेरीच्या अंतिम लढतीस पूर्ण क्षमतेने म्हणजे १५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती असेल, असेही संयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. लंडनमध्ये इतक्या मोठ्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच आऊट डोअर स्पर्धा असेल. या स्पर्धेच्या तिकिट विक्रीला सुरवात झाली असून, उद्या गुरुवारपासून दुपारीच प्रेक्षकांना आपली नोंदणी सुरु करता येणार आहे. तिकिट धारकांना कोर्टवर उपस्थित राहताना मास्क घालणे अनिवार्य असेल. त्याचबरोबर बसताना योग्य अंतरही ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर कोविड १९ चा संसर्ग नसल्याचा पुरावा देखिल प्रवेश द्वारावर द्यावा लागणार आहे. यात लसीचे दोन्ही डोस झाल्याचा किंवा ४८ तासापूर्वी झालेला चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट ग्राह्य धरता येणार आहे.