ठाकरेंसह विधानपरिषदेचे नऊ जण बिनविरोध आमदार; सोमवारी शपथविधी

0
355

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उमेदवार असलेली निवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. या निवडणुकीत आघाडी सरकार सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते, पण ते संकट आता टळले आहे.

या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हे (शिवसेना), राजेश राठोड (काँग्रेस), शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी(राष्ट्रवादी काँग्रेस), रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके,
रमेश कराड (भाजप) यांचा समावेश आहे.