दुचाकी चोरट्यांवर पोलिसांचा ‘डबल स्ट्राईक’; ३२ दुचाकी, २४ मोबाईल जप्त

bpcauthor
2 Min Read

दुचाकी चोरट्यांवर पोलिसांचा ‘डबल स्ट्राईक’; ३२ दुचाकी, २४ मोबाईल जप्त

वाकड–बावधन पोलिसांची मोठी कारवाई; २०.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, वाहनचोरीचे २४ गुन्हे उघड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांविरोधात वाकड आणि बावधन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३२ दुचाकी आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, सुमारे २० लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाहनचोरीचे एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ दुचाकी जप्त केल्या. तसेच १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६, रा. आकुर्डी, देवाची) याला १ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मागील दोन वर्षांत पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून तब्बल २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

विशेष म्हणजे जैसवाल हा खासगी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करतो. तो मौजमजेसाठी दुचाकी चोरायचा, काही काळ वापरल्यानंतर ती कुठेही सोडून पुन्हा दुसरी दुचाकी चोरायचा, अशी माहिती तपासातून समोर आली. वाकड पोलिसांनी देवप्रकाश मदनसिंग (वय ३५, रा. ताथवडे) आणि संतोष मोहन मांगीलाल (वय २८, रा. वाकड) यांनाही अटक करून दोन मोपेड जप्त केल्या.

दरम्यान, बावधन पोलिसांनी स्वतंत्र कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

म्हाळुंगे–नांदे रोडवर गस्तीदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या युनिकॉर्नवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. चौकशीत अनिल लहू जाधव (वय २०) याच्यासह अन्य साथीदारांचा सहभाग समोर आला. या टोळीकडून बावधनमधील चार, हिंजवडीतील दोन आणि शिरगाव–परंदवडी येथील एक असे सात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले.

Share This Article