पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्याचा छळ; भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा

2 Min Read

पुणे दि . १९ ( पीसीबी ) : पुणे महानगरपालिकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करून, अपमानास्पद भाषा वापरून आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांनी आरोपींना पालिका परिसरात प्रवेशबंदीचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याने स्वतः शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली असून तक्रारीनुसार, ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यासह इतर चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांनी कोणत्याही अधिकृत कामाशिवाय आरोग्य विभागात येऊन महिला अधिकाऱ्याचा सातत्याने पाठलाग केला आणि कार्यालयीन सहकारी उपस्थित असतानाही तिच्याबद्दल अपमानास्पद आणि अश्लील टिप्पणी करून तिची मानहानी केली. आरोपींच्या या त्रासामुळे संबंधित महिला अधिकारी मानसिकरित्या त्रस्त झाल्या असून, त्यांना आता कामावर जाण्याचीही भीती वाटू लागली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्तांनी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांना महापालिका भवन तसेच महापालिकेशी संबंधित कोणत्याही मालमत्तेत प्रवेश करण्यास तात्काळ प्रतिबंध घातला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share This Article