आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात गुंजला भव्य महाराष्ट्र महोत्सव

bpcauthor bpcauthor
4 Min Read
  • ग्रामीण महाराष्ट्रातून ३५०० सहभागी आणि १०० हून अधिक शेतकरी महोत्सवासाठी बेंगळुरूत दाखल

महाराष्ट्रातील ३० शाळांमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा इंट्युशन प्रोग्राम राबविण्यात येणार, ज्यामुळे १७,००० हून अधिक विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढविणे, अंतर्ज्ञानी क्षमता विकसित करणे, भावना नियंत्रित करणे आणि मानवी मूल्यांचा पुनरुज्जीवन साधणे शक्य होणार आहे.

बेंगळुरू, दि. ३ – आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा तीन दिवसांचा उत्सव महाराष्ट्रभरातून आलेल्या ३५०० पेक्षा अधिक सहभागींना एकत्र आणणारा एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शाश्वत जीवनशैलीचा संगम ठरला आहे.
या कार्यक्रमात ग्रामीण शेतकरी, युवक, स्वयंसेवक आणि सामुदायिक नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा महोत्सव ३० मे ते १ जून दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडत आहे.

आजच्या संध्याकाळच्या सत्संगात महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा. ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे उपस्थित होते. त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगने नैसर्गिक शेती आणि समग्र ग्रामीण विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात घडवून आणलेल्या परिवर्तनाचे कौतुक केले.

“गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आपल्या ज्ञानाने आणि वचनांच्या माधुर्याने आपल्या जीवनाला समृद्ध केले आहे,” असे मंत्री महोदय म्हणाले. “गुरुदेवांच्या दृष्टीकोनामुळे नैसर्गिक शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या उपक्रमाला प्रोत्साहन देणे आणि विस्तार करणे आवश्यक आहे.”

त्यांनी गुरुदेवांच्या जालना जिल्ह्यातकृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीकोनाचाही उल्लेख केला. “या दृष्टीला आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी मी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे समर्पित स्वयंसेवक यांच्यासह आपण नैसर्गिक शेतीचा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू. चला, एकत्र येऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्ध आणि संपन्न भविष्य घडवूया.”

महोत्सवाच्या दरम्यान दररोजच्या संध्याकाळी वातावरण भक्तिगीतांनी भारलेले असते आणि हजारो भाविक संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर यांचे अभंग गात भक्तिरसात चिंब होतात.
गुरुदेवांनी विठोबा या देवतेच्या ‘सखा’ रूपातल्या उपासनेचा विशेष उल्लेख केला. “जेव्हा सखा-भाव असतो, तेव्हा भक्त आणि देव यांच्यात काही अंतर राहत नाही, कुठलाही संकोच राहत नाही.”

३० मेच्या संध्याकाळी झालेल्या सत्संगात गुरुदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगितले, “ते अजूनही आपल्या सोबत आहेत. जेव्हा कोणी महान व्यक्ती समाजात परिवर्तन घडवते, जागृती निर्माण करते आणि विकृती नष्ट करते, तेव्हा ती व्यक्ती जनतेच्या हृदयात सदैव जिवंत राहते. असे महान नेता कधीही मरत नाहीत.”

गुरुदेवांनी महाराष्ट्रातील तरुणाईच्या उत्साहाचे आणि सकारात्मकतेचेही कौतुक केले. या तरुणांनी नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जलसंवर्धनाच्या कामात पुढाकार घेतला आहे, ज्यामध्ये ३७ नद्या आणि ओढ्यांचे पुनरुज्जीवन झाले असून, ७.२ लाख झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे २१ लाखांहून अधिक लोक लाभले आहेत.
लातूरसारख्या शहरांमध्ये, जे पूर्वी पाण्यासाठी टँकर आणि रेल्वेवर अवलंबून होते, आता स्वयंपूर्ण झाली आहेत, याचे श्रेय जलसंवर्धनाच्या प्रभावी कार्याला जाते.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नैसर्गिक शेती अभियानाने भारतभरातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी शून्य-बजेट, रसायनमुक्त शेती स्वीकारली आहे, जी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम आहे. या प्रयत्नांमुळे पीक क्षमता वाढली, मातीची सुपीकता सुधारली, खर्च कमी झाले आणि कर्जमुक्त शेती शक्य झाली आहे.

महाराष्ट्र महोत्सवात आध्यात्मिक प्रवचनं, ध्यान सत्रं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाश्वत शेती, जलसंवर्धन, आणि युवक सक्षमीकरणावर आधारित ज्ञानसत्रांचाही समावेश होता.
हा महोत्सव विविध पिढ्यांमधील संवाद, प्रादेशिक अभिमान आणि सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी मंच बनला आहे.

३० मेच्या सांस्कृतिक सायंकाळी कलाकारांनी गवळण, भारूड आणि शिवकालीन कलांचा मनमोहक सादरीकरण करून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला वंदन केले.
बेंगळुरूच्या गोसाई मठाचे स्वामी मञ्जुनाथ यांनीही भक्तिभावाने भरलेले भजन सादर केले आणि वातावरण भक्ति आणि आनंदाने न्हाऊन निघाले.

Share This Article