स्थानिकांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुले बचावली

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि ५ जुलै (पीसीबी ) – चऱ्होली येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुलांचा जीव बचावला. स्कूलबस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेल्याची घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आळंदी मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकात घडली.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. यावेळी बस मध्ये 70 विद्यार्थी होते.

तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे, सुरज दाभाडे, ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी स्कूलबसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

या अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. माजी महापौर नितीन काळजी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्कूलबस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढली.

सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. काळ आला होता पण वेळ नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

Share This Article