१२५ कोटींमध्ये फसवणूक करणाऱ्या विनोद खुटेवर ईडी ची कारवाई

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पुणे, दि. १४ (पीसीबी) – मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची १२५ कोटींमध्ये फसवणूक करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटेवर कारवाई झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने विनोद खुटे यांची ३८ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत बँकेतील २३ कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे. खुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे. खुटे फसवणूक करुन दुबईत फरार झाला आहे. दुबईत त्याचे अनेक फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे.

हवालाद्वारे पैसा विदेशात
ईडीने काही महिन्यांपूर्वी विनोद खुटे याच्या कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी त्या कंपनीची 18.54 कोटी रुपयांची बँकेतील रक्कम गोठवली होती. विनोद कुटे याचा VIPS ग्रुप ऑफ कंपनीजकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाले. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. तसेच हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो. यामुळे ईडीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि कारवाईला सुरुवात झाली.

गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून फसवणूक
पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तयार केली. त्याने गुंतवणुकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले. इतर ठिकाणी मिळत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज दिले. यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली.

Share This Article