जुन्या वादातून हॉटेल चालकास मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) -जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका हॉटेल चालकास बेदम मारहाण केली. तसेच हॉटेल चालकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

भारत कीमतराम आसवानी (वय 53, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण नाना देवकर (वय 60), तीन महिला आणि त्यांचे इतर चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसवानी यांचे निघोजे गावात शितल रेस्टॉरंट अँड बार नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये रविवारी आरोपींचा नातेवाईक आणि फिर्यादी यांच्यामध्ये वाद झाला होता. त्या कारणावरून आरोपी सोमवारी हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फेकून मारला. तसेच त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने ओढून घेतले. काउंटरवरील फरसाण आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत हॉटेलमधील फिल्टर, फ्रिजच्या दरवाज्याची काच, टीव्ही काउंटर जवळील काच असे साहित्य फोडून नुकसान केले. भांडण सोडविण्यासाठी हॉटेलमधील कामगार आला असता त्याच्या डोक्यात काचेचा ग्लास मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article