2024 नंतर लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील

0
147

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : ईडी आणि सीबीआयच्या कारवायांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणलं जातंय. त्यांच्या कुटुंबातील महिला- लहान बालकांचा विचारही न करता 16-16 तास चौकशी केली जात आहे. पण असल्या कारवायांपुढे आम्ही गुडघे टेकणार नाही. जनता सगळं पाहतेय. 2024 नंतर याच लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील. इराण-इराक, लिबियामध्ये हुकुमशाही वृत्तीच्या नेत्यांना असं केलंय. भारतातदेखील तेच चित्र आहे. जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना नेते सदानंद कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवायांवरून संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

राजकीय सूडबुद्धीने कारवाया…
महाराष्ट्रात आणि देशात सुरु असलेल्या कारवाया राजकीय सूडबुद्धीने केल्या जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘ सदानंद कदम शिवसेनेच्या पदावर नाहीत पण परिवारातले आहेत. हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते. सहकार क्षेत्रातलं मोठं नाव. कोल्हापूरचं मोठं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली. काल अटक होणार… असं मुलुंडचे पोपटलाल बोंबलत होते.

खेडच्या सभेचा राग?
ज्या प्रकरणाची चौकशी दीड वर्षांपासून सुरु आहे. तथाकथित रिसॉर्ट अजून सुरु झालेला नाही. त्यातून प्रदुषित पाणी कुठं तरी जातंय, हा ईडीचा विषय आहे का? खेडची सभा यशस्वी करण्यामागे जे लोक मेहनत घेत होते, त्यात सदानंद कदम यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी ईडीचे अधिकारी खेडला गेले. कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. ही बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडच्या पोपटलालने दिली. हायकोर्टाने त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तिकडे बिहारमध्ये लालू यादव हे गंभीर आजारातून बरे होत आहेत. त्यांची पत्नी, गर्भवती सून, यांची १६-१६ तास चौकशी सुरु आहे. किरीट सोमय्यांच्या वक्रात घोटाळ्यात क्लीन चिट दिली.

मी पण कारखान्यांची यादी देणार..
हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यांचा विषय काढलाय. भविष्यात काही कारखान्यांची यादी फडणवीस यांना पाठवणार आहे. त्यांच्याविरोधात ईडी कारवाई करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे. विशेषतः कसब्यानंतर जे वातावरण निर्माण झालंय, त्याला खिळ घालण्यासाठी या ईडीच्या कारवाया सुरु आहेत. बोगस, भंपक आणि खोट्या कारवाया आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, सदानंद कदम यांच्याबाबतीत हेच आहे. जे जे विरोधात बोलतायत त्यांच्याविरोधात ईडी-सीबीआयच्या कारवाया सुरु आहेत. देशातील ९ नेत्यांनी पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सह्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही गुडघे टेकणार नाहीत. जनता आमच्याबरोबर आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन जन्माला आलं नाही.

रस्त्यावर उतरून जनता मारेल..
संजय राऊत यांनी भाजप सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, ‘ २०१४ नंतर लफंग्यांना जनता या लोकांना रस्त्यावर उतरून मारेल. लिबिया, इराक, इराणमध्ये लोकांनी हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना रस्त्यावर आणून मारलंय. मी काल ठाण्यात होतो. तिथलं चित्र पाहिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत मला काही बदल दिसला नाही. इलेक्शन कमिशनने काहीही लिहून दिलं तरी ठाण्यातली शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. इचलकरंजीत गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचला. जनतेनं त्यांची गाडी अडवली. जनता याला मारतेय असं वाटलं. ही संताप आणि चीड लोकांच्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.