पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या तथाकथित पत्रकाराला पोलिसांनी पाठलाग करत ठोकल्या बेड्या

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पुणे, दि.१९ (पीसीबी); पुण्यातील व्यावसायिकाला पाच कोटीची खंडणी मागणारा सोलापूरचा बनावट पत्रकार आणि पोलिसात पाटस टोलनाक्यावर थरार घडला. पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या आरोपीच्या गाडीच्या टायरवर पोलिसांनी फायरींग केली. महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती.

आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रूपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळाेवेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळ्या खोट्या बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बाेलावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली होती.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक , अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे रवाना झाले.

पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता
तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला.
गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत.
पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share This Article