- भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास; अत्याधुनिक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
- शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण
पिंपरी-चिंचवड | – भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालय हे केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचे ठिकाण न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे, कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे प्रभावी केंद्र ठरले पाहिजे. पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांच्या समर्पणात आणि जनतेच्या विश्वासात आहे. त्यामुळे नव्या कार्यालयाच्या माध्यमातून संघटन अधिक सक्षम करत नागरिकांशी असलेली नाळ अधिक घट्ट करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने या कार्यालयात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिलेली संघटना आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. शहरातील नागरिकांना पक्षाच्या कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद, योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी पाठपुरावा मिळाला पाहिजे.
या उद्घाटन सोहळ्याला भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटणी, वैशाली खाड्ये, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, सदाशिव खाडे, अनुप मोरे, राजेश पिल्ले, तेजस्विनी दुर्गे, शितल शिंदे यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, विविध मोर्चे, आघाड्या व प्रकोष्ठांचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रास्ताविक केले व विकास डोळस यांनी आभार मानले.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज शहर कार्यालय
मोरवाडीतील शहर मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या वाढत्या संघटनात्मक गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, डिजिटल मीडिया कक्ष, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आधुनिक केबिन, ग्रंथालय तसेच पक्षाच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमुळे शहरातील विविध मंडल, मोर्चे, आघाड्या आणि प्रकोष्ठ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण उपक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भातील पाठपुरावा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटनाला नवी दिशा
पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि नागरिकांपर्यंत पक्षाचे कार्य प्रभावीपणे पोहोचविणे, या उद्देशाने शहर मध्यवर्ती कार्यालय अधिक सुसज्ज करण्यात आले आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांना गती देण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण काम करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिक, कार्यकर्ते आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
“भारतीय जनता पार्टीसाठी कार्यालय म्हणजे केवळ विटा-सिमेंटची वास्तू नाही, तर कार्यकर्त्यांच्या विचारांना दिशा देणारे, त्यांच्या कार्याला ऊर्जा देणारे आणि समाजसेवेचा संकल्प अधिक मजबूत करणारे केंद्र आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी काम करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. या अत्याधुनिक कार्यालयातून पक्षाचे संघटन अधिक सक्षम होईल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होतील, असा मला विश्वास आहे. हे कार्यालय सत्तेचे नव्हे, तर सेवेचे केंद्र बनले पाहिजे.
- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी.
” पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या संघटनेचा कणा आहे. कार्यकर्त्यांना हक्काचे, सुविधांनी सुसज्ज आणि संघटनात्मक कामकाजासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. शहरातील सर्व मंडल, मोर्चे, आघाड्या आणि प्रकोष्ठ यांच्यात अधिक चांगला समन्वय साधून पक्षाचे कार्य घराघरांत पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यावर संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणे आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे, यासाठी हे कार्यालय सक्रिय राहील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा संघटन अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड.

