खासदार शिवाजीराव आढळरावांमुळेच खेडचा विमानतळ झाला नाही – अजित पवार

0
1310

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – खेड परिसरात नियोजित असलेला विमानतळ शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामुळेच होऊ शकला नाही, त्यांच्यामुळेच विमानतळ दुसरीकडे गेला, असा आरोप  राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अच्छे दिनचे आश्वासन दाखवून  भाजप सरकारने  गेल्या साडेचार वर्षात नुसतीच गाजरे दाखवली आहेत. आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. यापुढे  भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी के.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अण्णा बनसोडे,  भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण कर्जमाफी केली नाही, शेतकरी आत्महत्या करतायेत. इंधन दरवाढ सुरूच आहे. जीएसटीमुळे  उद्योजक, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. काळा पैसा बाहेर काढण्याचे कारण देऊन नोटाबंदी करण्यात आली.  धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. सत्तेचा कालावधी संपत आला तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही.  सर्वच घटकातील नागरिक भाजप सरकारवर नाराज  असल्याने आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले.