२६/११ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्याचा सरकारला विसर – अजित पवार

0
597

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज (सोमवारी) १० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, शहिदांना मानवंदना देण्याचा विसर राज्य सरकारला पडला असून हे असंवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते व आमदार अजित पवार यांनी आज ( सोमवारी) केली.  

सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे.  त्यामुळे सरकारच्या वतीने दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आणि मृत्यमुखी पडलेल्या लोकांना सभागृहात आदरांजली अर्पण करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करताच विधानसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून सरकारवर टीका केली आहे.

विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत शहिदांना सभागृहात मानवंदना देण्यात यावी, अशी मागणी केली. २६/११चा हल्ला अत्यंत क्रुर आणि दुर्दैवी होता. सरकारने जवानांच्या व मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती सद्भावना व्यक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. त्यानंतर सरकारने मागणी मान्य करत सभागृहात शहिद जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मानवंदना दिली.